मराठी तरुणांना उद्योजकांसाठी प्रेरणा देणारे पुण्यातील नामदेवराव जाधव यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मी उदयनराजेंना नवीन पक्ष काढण्यासंदर्भात बोललो होतो, पण ते भाजपात गेले. त्यामुळे पर्याय नसल्याने मी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करतोय, असे जाधव यांनी थेट रशियातून सांगितलं. मी मुंबईत आल्यानंतर पुण्याला येऊन माझ्या पुढील राजकीय प्रवेशाबाबत ठरवेल, असे नामदेवराव जाधव यांनी म्हटलंय. रशियाची राजधानी मोस्को येथून नामदेवराव यांनी आपल्या 'वंचित' प्रवेशाची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकारणात एंट्री केली आहे.
मला मराठी तरुणांमध्ये उद्योजक घडवायचे आहेत, त्यासाठी राजकारणात यावंच लागेल. अन्यथा, मी 500 वर्षातही बारामतीसारख शहर उभारू शकणार नाही, असे नामदेव जाधव यांनी म्हटले आहे. ''मी गेले वीस वर्ष महाराष्ट्र फिरतोय, इथे फक्त गुंड-मवाली-तस्कर-खंडणी बहाद्दर-चोर-बलात्काऱ्यांचं राज्य आहे. या सर्वांचा कायमचा माज जिरवण्यासाठी मी आता राजकारणात येतोय. कारण इतिहासकार लेखक-साहित्यिक-विचारवंत म्हणून या देशातील प्रस्थापितांनी माझ्या भूमिकेला महत्व दिले नाही, असेही नामदेव जाधव यांनी म्हटलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाची मांडणी करणं हेच माझं स्वप्न आहे.
महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती पाहून मी हा निर्णय घेत आहे. समाजातील वंचित, पीडित, शोषित यांच्या न्यायाहक्कासाठी मी लढणार आहे. मी आमचे पूर्वज श्रीकृष्ण यांच्यापासून प्रेरणा घेतो, कारण श्रीकृष्णांनी सर्वच वंचित, गरीब आणि शोषितांना सोबत घेऊनच गोवर्धन पर्वत उचलला होता. म्हणून मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यातील पीडित कामगार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणात येत असल्याचे नामदेव जाधव यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन जाहीर केलं आहे. जाधव यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत असल्याचं सांगितंलय.