कोरोना विरोधातील लढ्याला इस्त्राईल दूतावासाचा मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 06:30 PM2020-04-15T18:30:06+5:302020-04-15T18:30:27+5:30
सरकारच्या या कामाला मदतीचा हात देण्यासाठी मुंबईतील इस्त्राईल दूतावासाने पुढाकार घेतला आहे.
मुंबई : कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने त्याला रोखण्यासाठी व त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी सर्व शक्य ते प्रयत्न केले जात आहेत. सरकार त्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत
आहे. सरकारच्या या कामाला मदतीचा हात देण्यासाठी मुंबईतील इस्त्राईल दूतावासाने पुढाकार घेतला आहे. भारत व इस्त्राईल मधील मैत्रीपूर्ण संबंध अधिक सशक्त करण्यासाठी मुंबईतील इस्त्राईल दूतावासाने शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन सरकारला दिले आहे. जे.जे.रुग्णालयात उपचार करत असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी दूतावासातर्फे सॅनिटायझर्स व ऑटोमॅटिक साबण वापरता येणारी मशिन दिली आहेत. सार्वजनिक शौचालयांचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रिरत्न प्रेरणा मंडळ या स्वयंसेवी संस्थेला दूतावासातर्फे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर देण्यात आली आहे.
१९५८ मध्ये इस्त्राईलच्या तत्कालिन परराष्ट्र मंत्री गोल्डा मायर यांनी स्थापन केलेल्या मॅशव्ह या संघटनेच्या माध्यमातून ही मदत केली जात आहे. या संस्थेच्या माध्यमातून जगभरातील
१०० हून अधिक देशांमध्ये काम केले जाते. सध्या जगातील विविध देशांमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊनची गंभीर परिस्थिती उद्भवलेली असल्याने तेथील नागरिकांची क्षमता वाढवण्यासाठी
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे प्रशिक्षण दिले जात आहे व त्यांचे समुपदेशन केले जात आहे. जे.जे. रुग्णालयाच्या काही डॉक्टरांनी विविध व्यावसायिक क्षमता वाढवण्यासाठी
सहाय्यभूत करणारे प्रशिक्षण त्यांच्या इस्त्राईल दौऱ्यात यापूर्वी घेतले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णाची मानसिकता वेगळ्या प्रकारची असते त्याला समजून घेत
त्यांची मानसिकता सकारात्मक करण्यासाठी सहाय्यभूत ठरणाऱ्या मेडिकल क्लॉन पध्दतीबाबत दूतावासाने रुग्णालयात डॉक्टरांना माहिती दिली होती.
इस्त्राईलचे मुंबईतील वाणिज्यदूत याकोव्ह फिंकेल्स्टिन म्हणाले, कोरोनाचा विषाणू व सोशल डिस्टन्सिंगमुळे भारत व इस्त्राईल प्रत्यक्षात अधिक जवळ आले आहेत. हे आपल्या
सर्वांसमोरील समान आव्हान असून आपण एकत्रितपणे त्यावर मात करु शकतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्रिरत्न प्रेरणा मंडळाचे दयानंद मोहिते म्हणाले, आम्ही इस्त्राईल दूतावासासोबत गेल्या ८ वर्षांपासून काम करत असून इस्त्राईलवरुन दरवर्षी येणारे शिष्टमंडळ खोतवाडी येथील
महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हात धुण्याबाबत व इतर विविध चांगल्या सवयींबाबत मार्गदर्शन करुन त्यांना त्याचे महत्त्व पटवून देते.