इस्राईल तरुणीच्या मृत्यूचे गूढ एका वर्षाने उलगडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 16:54 IST2018-07-03T16:50:24+5:302018-07-03T16:54:35+5:30
व्हिसेरा अहवालानंतर प्रियकरावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

इस्राईल तरुणीच्या मृत्यूचे गूढ एका वर्षाने उलगडले
मुंबई - मुंबई पाहण्यासाठी आलेल्या ओरीरॉन याकोव्ह (वय २३) आणि त्याच्या प्रेयसीला चांगलेच महाग पडले. मार्च २०१७ मध्ये कुलाब्यातील एका हॉटेलमध्ये थांबलेल्या ओरीरॉन याकोव्हविरोधात प्रेयसीच्या खुनास कारणीभूत ठरल्याने कुलाबा पोलीस ठाण्यात तब्ब्ल एका वर्षाने सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळचा इस्राईलचा रहिवासी असलेला ओरीरॉन याकोव्ह हा त्याच्या प्रेयसीसोबत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कुलाब्यातील एका हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, दुपारच्यावेळी २० वर्षीय प्रेयसी काहीच हालचाल करत नसल्याचे ओरीरॉन याकोव्हने पोलिसांना सांगितले. त्यानंतर तरुणीचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला होता. मात्र, कोणत्याच संशयास्पद खुणा नसल्याने या मृत्यूबाबत मोठे गूढ निर्माण झाले होते. त्यानंतर शवविच्छेदनानंतर तिचा व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबला पाठवून आकस्मित मृत्यूची कुलाबा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. वर्षभराने कुलाबा पोलिसांना व्हिसेरा अहवाल मिळाला. मात्र, या अहवालातून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या अहवालातून ओरीरॉन याकोव्ह हा प्रेयसीचा विरोध असून सेक्स करत होता. मात्र, झटापटीत ओरीरॉन याकोव्हचा हात प्रेयसीच्या गळ्यावर पडला. त्यामुळे तिचा श्वास कोंडून तिचा मृत्यू झाला असल्याची थक्क करणारी बाब उघड झाली आहे. सुरुवातीस प्रेयसी बेशुद्ध अवस्थेत असताना ओरीरॉन याकोव्हला ती झोपली असल्याचे वाटले. मात्र, बऱ्याच वेळाने तिला हलवून देखील ती प्रतिसाद देत नसल्याने ओरीरॉन याकोव्हने पोलिसांची मदत घेतली होती. अखेर फॉरेन्सिक अहवाल आणि तज्ज्ञांच्या मतानंतर ओरीरॉन याकोव्हविरोधात प्रेयसीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या ओरीरॉन याकोव्ह हा इस्राईलमध्ये आहे.