बिग बी अमिताभ बच्चन यांना पाहून इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारावले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 09:31 AM2018-01-19T09:31:39+5:302018-01-19T11:09:06+5:30
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी मुंबईमध्ये बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची भेट घेतली.
मुंबई - इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी (18 जानेवारी) मुंबईमध्ये बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची भेट घेतली. बॉलिवूड कलाकारांना भेटून नि:शब्द झाल्याचे नेतान्याहू यांनी यावेळी सांगितले. यावेळी बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, अभिषेक बच्चन, करण जोहर, इम्तियाज अली, मधुर भंडारकर, विवेक ओबेरॉय, प्रसून जोशी यांच्यासहीत अनेक कलाकार उपस्थित होते. यावेळी नेतान्याहू यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'प्यारे दोस्तो, नमस्कार...'असे म्हणत केली.
Will my Bollywood selfie beat @TheEllenShow Hollywood selfie at the Oscars? @SrBachchan@juniorbachchan@rajcheerfull@imbhandarkar@vivek_oberoi @ pic.twitter.com/v1r0GIhKLy
— Benjamin Netanyahu (@netanyahu) January 18, 2018
पुढे ते असे म्हणाले की, ''मी एक मोठा सेलिब्रिटी आहे, असे मला वाटत होते. मात्र मला अमिताभ बच्चन यांच्या कार्याची जाणीव झाली. ट्विटरवर अमिताभ यांचे 3 कोटींहून अधिक फॉलोअर्स. मी निशब्द झालोय'', असे सांगत त्यांनी बिग बींचं कौतुक केले.
संपूर्ण जग बॉलिवूडचं चाहतं आहे. इस्त्रायलही बॉलिवूडचा चाहता आहे आणि मीदेखील तुमचा चाहता आहे. आम्ही नुकतेच सिनेमा क्षेत्रासंदर्भातील एक विधेयक पास केले आहे.
आम्ही सिनेमा क्षेत्रात 40 लाख शेकल्स (इस्त्रायलचे चलन) गुंतवले आहे. तुम्ही आमच्या देशात यावे, आम्ही सिनेमामध्ये अधिक गुंतवणूक करू, असेही नेतान्याहू यांनी यावेळी म्हटले. आम्हाला इस्त्रायलमध्ये बॉलिवूड पाहायचं आहे. येथे तुम्हाला केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञान नाही तर सर्जनशीलतादेखील पाहायला मिळेल. बॉलिवूडचा विकास म्हणजे जगात भारताचा विकास आणि इस्त्रायली तंत्रज्ञानाचाही विकास होईल. आमचे तंत्रज्ञान, विज्ञान आणि कला तुमच्यासोबत मिळाल्यास जादुई देखावा पाहायला मिळेल, असेदेखील नेतान्याहून यावेळी म्हणालेत.
यावेळी त्यांनी बॉलिवूड कलाकारांसोबत सेल्फीदेखील काढला. नेतान्याहू यांनी आपल्या भाषणाचा शेवट जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्त्रायल असे म्हणत केली.