मुंबई : जगापुढील पाणीप्रश्न दिवसागणिक गंभीर बनत आहे. भविष्यातील पाणीबाणी टाळण्यासाठी प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे. पाण्याचा दर्जा टिकवण्याचे आव्हानही जगासमोर आहे. या दोन्ही बाबतीत इस्रायलने व्यापक चळवळ उभारली असून, जलसंवर्धनासाठी भारताला सहकार्य करण्याची आमची भूमिका असल्याचे इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्यदूत (कॉन्सुल जनरल) कोबी शोशानी यांनी सांगितले.
कोबी शोशानी यांनी शुक्रवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत मीडिया’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले. ‘लोकमत’चे कार्य, वाचक आणि भूमिका याविषयी त्यांनी सविस्तर माहिती घेतली. या वेळी त्यांनी भारत-इस्रायल संबंधांसह विविध विषयांवर भाष्य केले.
जल व्यवस्थापन इस्रायलच्या जनसंपर्काच्या केंद्रस्थानी आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जलव्यवस्थापनासाठी विशेष पद तयार केले असून, नवी दिल्लीतील दूतावासात पहिल्या जलदूतांची नियुक्ती केल्याची माहिती शोशानी यांनी दिली. भारतीय लोकांच्या स्वभावात वेगळीच जादू आहे. ती प्रत्येक टप्प्यावर प्रेमात पाडत जाते. एक परदेशी नागरिक म्हणून मला वेळोवेळी त्याची प्रचिती येते. विकासात्मकदृष्ट्याही भारताने मोठी झेप घेतली आहे. मी १९९२ साली येथे पहिल्यांदा आलो, तेव्हाचा भारत आणि आताचा भारत यात जमीन अस्मानाचा फरक आहे. सी-लिंकसारख्या प्रकल्पाने तर मुंबईच्या विकासाची दिशाच बदलून टाकली आहे, असे कौतुकोद्गारही त्यांनी काढले. या वेळी मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी, डिजिटलचे संपादक आशीष जाधव यांनी त्यांना विविध विषयांवर बोलते केले.
n२९ जानेवारीला दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांना ३० वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात भारत-इस्रायल व्यापार २० पटीने वाढून वार्षिक ४ अब्ज डॉलरच्या घरात पोहचला आहे. अंतर्गत सुरक्षा, वैद्यकीय उपकरणे, एआय, रोबोटिक्स, पदार्थ विज्ञान, स्वच्छ आणि हरित ऊर्जा तंत्रज्ञान, तसेच फिनटेकसारख्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याला मोठा वाव आहे.
पत्रकारिता निखळ असावीप्रसारमाध्यमे ही समाजमनाचा आरसा आहेत. त्यातून प्रतिबिंबित होणारे चित्र स्वच्छ, निखळ आणि निष्पक्ष असले, तरच वाचक टिकून राहतात. प्रसंगी विरोध पत्करावा लागला तरी भूमिकेवर ठाम राहणे, हे प्रत्येक माध्यमांचे आद्यकर्तव्य आहे. ‘लोकमत’च्या आजवरच्या कार्याचा आलेख पाहता त्यांनी आदर्श वस्तुपाठ तयार केला आहे, असे गौरवोद्गारही शोशानी यांनी काढले.
इस्रायली विद्यापीठांत सर्वाधिक भारतीयइस्रायली विद्यापीठांत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीयांचा आकडा सर्वाधिक असून, आमची विद्यापीठे आणि कंपन्यांत त्यांना मागणी आहे, असे शोशानी यांनी सांगितले.