मुंबई : विश्व हिंदू परिषद, बजरंग दलसारख्या संघटनांनी उचललेले धर्मांतर, घरवापसीसारख्या बाबी विकासाच्या राजकारणाला बाधक असल्याची टीका केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण आणि ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी केली. एकीकडे संघ परिवारातील संघटनांच्या धार्मिक राजकारणावर टीका करतानाच मोदी सरकारने मात्र विकासाच्या मुद्द्यावरच लक्ष केंद्रित केल्याची पुष्टीही पासवान यांनी जोडली. भारतीय मानक ब्युरोच्या पश्चिम क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी पासवान मुंबई दौऱ्यावर होते. या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पासवान म्हणाले की, विकासाच्या मुद्द्यावर जनतेने केंद्रात मोदी सरकारला सत्ता बहाल केली आहे. मोदींचे सरकारही त्याच दिशेने काम करीत आहे. केंद्र सरकारच्या अशा वक्तव्यांशी काही संबंध नाही. मात्र, घरवापसी, हिंदूंनी चार मुले जन्माला घालावीत की दहा, या प्रश्नांवरची चर्चा विकासाच्या मार्गातील अडथळा आहे. राज्यातील ऊसदराच्या संदर्भात बोलताना पासवान म्हणाले की, एफआरपीनुसार भाव हा शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळायला हवा. केंद्र सरकार यादृष्टीने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांना दर्जेदार वस्तू मिळाव्यात आणि त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी भारतीय मानक ब्युरोने ग्राहकांमध्ये जनजागरणावर भर द्यायला हवा; तसेच ज्या वस्तू मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतात त्यांचे उत्पादन योग्य पद्धतीने होईल यादृष्टीने पाहणी करण्याची आवश्यकता असल्याचे पासवान म्हणाले. सोने-चांदीच्या धर्तीवर प्लॅटीनमसारख्या धातूंचे प्रमाणीकरण करण्याच्या सूचनाही संस्थेला दिल्याचे पासवान यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)
धर्मांतराचा मुद्दा विकासाला अडथळा - रामविलास पासवान
By admin | Published: January 20, 2015 1:17 AM