Join us

'धार्मिक प्रार्थनास्थळानिकट गर्दी अन् आपत्कालीन यंत्रणेचा मुद्दा ऐरणीवर'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2022 4:25 PM

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कटरा येथील वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती.

ठळक मुद्देआता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनीह दुर्दैवी घटनेबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहेत. 

मुंबई - जम्मू काश्मीरमधील कटरा येथे असलेले श्री माता वैष्णो देवी मंदिर (Vaishnodevi Temple) परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर १३ हून अधिक भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच नाराजीही व्यक्त केली आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनीह दुर्दैवी घटनेबद्दल सहवेदना व्यक्त केल्या आहेत. 

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी कटरा येथील वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी वैष्णो देवी मंदिर भवन परिसरात शनिवारी मध्यरात्री २.४५ वाजता चेंगराचेंगरी झाली. या घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलीस नियंत्रण कक्षाने सांगितले. मात्र, या दुर्घटनेत १२ जणांनी आपला जीव गमावला, तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबद्दल शरद पवार यांनी शोक व्यक्त केला असून प्रार्थनास्थळानजीकच्या आपत्कालीन स्थितीचा मुद्दाही उपस्थित केला आहे.  ''वैष्णोदेवी मंदिराबाहेर चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेत काही भाविकांचा मृत्यू झाला व अनेक भाविक जखमी झालेत. दुर्घटनेतील मृतांच्या आप्त-परिवारांच्या दुःखात सहसंवेदना, असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे. तसेच, धार्मिक प्रार्थनास्थळांनिकट गर्दी व्यवस्थापनाचा व आपत्कालीन नियंत्रणाचा मुद्दा या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आल्याचेही'', पवार यांनी म्हटले आहे. 

श्रद्धाळू ऐकतच नाहीत, विशेषत: तरुण पिढी

जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, कोरोनाचे संकट असून गेलेले नाही. कोरोनासंदर्भात गाइडलाइन्स देण्यात आलेल्या आहेत. तरीही वैष्णो देवी मंदिरात मोठी गर्दी झाली. विशेष करून तरुण पिढी समजून घेत नाही. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा तेथे मोठ्या प्रमाणात तरुण मंडळी उपस्थित होती. त्यावेळेस बाचाबाची झाल्याचे सांगितले जात आहे. दर्शनासाठी येणारे भाविक समजून घेत नाहीत. दुसरीकडे तरुण पिढी ऐकत नाही. कोरोनाच्या गाइडलाइन्स पुन्हा लागू करण्यात आल्या असून, एक हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे, अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी यावेळी दिली.

मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान मदत निधीतून दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींना उपचारांसाठी सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसअपघात