फेरीवाल्यांचा मुद्दा पालिका सभेत पेटला
By admin | Published: July 31, 2014 01:30 AM2014-07-31T01:30:39+5:302014-07-31T01:30:39+5:30
मुंबईत वाढणाऱ्या फेरीवाल्यांचे संकट यावर तोडगा काढण्यासाठी बोलाविलेल्या पालिकेच्या महासभेत आज प्रांतवाद पेटला़
मुंबई : मुंबईत वाढणाऱ्या फेरीवाल्यांचे संकट यावर तोडगा काढण्यासाठी बोलाविलेल्या पालिकेच्या महासभेत आज प्रांतवाद पेटला़ दुबईकर म्हणून हिणवणाऱ्या भाजपा सदस्याला समाजवादी पक्षाच्या गटनेत्याने गुजरातचा टोला मारताच सभागृहात रणकंदन माजले़ यामुळे अडचणीत आलेल्या महापौरांनी मित्रपक्षाला सुखावण्यासाठी हा शब्दच पटलावरून काढून टाकला़ मात्र यावरही समाधान होत नसल्याने भाजपाचा गोंधळ सुरूच राहिला़ अखेर मित्रपक्षापुढे हतबल झालेल्या महापौरांनी सभा गुंडाळली़
फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पालिकेने सुरू केलेल्या सर्वेक्षणात सव्वा लाख अर्ज आले़ हा लोंढा परप्रांतातील असल्याने भूमिपुत्रांवर अन्याय होईल, असा साक्षात्कार झाल्यानंतर सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी पालिकेच्या विशेष महासभेत आज निवेदन केले़ या सर्वेक्षणातील बोगसपणा मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी निदर्शनास आणला़
मात्र यावर आक्षेप घेत भूमिपुत्र म्हणजे नेमके कोण, बिहार व उत्तर प्रदेशातून आणलेल्या नागरिकांनाही मुंबईत फेरीचा धंदा करण्याचा कायद्याने अधिकार आहे, असे मत समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी मांडले़
यावर तुम्ही दुबईवाले काय समजणार मुंबईचा त्रास, असे भाजपातून हिणविण्यास सुरुवात झाली़ यास शेख यांनी भाजपाच्या एका नगरसेविकेला तू पण गुजरातहून आली आहेस, असे प्रत्युत्तर दिले़ यामुळे संतप्त झालेल्या भाजपाने शेख यांना घेराव घालून माफी मागण्यास सांगितले़
मात्र शेखही आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने महापौर सुनील प्रभू यांची कोंडी झाली़ शेख यांचा शब्द सभागृहाच्या पटलावरून काढून टाकतो, पण आपण शांत बसा, अशा महापौरांच्या मिनतवाऱ्याही भाजपाचा राग थंड करू शकल्या नाहीत़ गटनेत्यांच्या बैठकीनंतरही हा वाद कायम राहिल्यामुळे अखेर महापौरांना सभाच गुंडाळणे भाग पडले़ (प्रतिनिधी)