Join us

एनओसी देतो; इमारतीला रंगरंगोटी करून द्या! मागणी करणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2023 10:20 AM

वांद्रे (पश्चिम) येथील एका गृहनिर्माण संस्थेच्या पाच पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : सोसायटीकडून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देतो; मात्र आधी संपूर्णइमारतीला रंगरंगोटी करून द्या, असे सांगणाऱ्या वांद्रे (पश्चिम) येथील एका गृहनिर्माण संस्थेच्या पाच पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे परिसरात हा प्रकार घडला असून, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.वांद्रे पोलिसांनी बुधवारी ‘सी हेवन’ सोसायटीचे अध्यक्ष अफजल काझी, कोषाध्यक्ष असगर जाफरी, सचिव अस्लम मुख्तार आणि व्यवस्थापकीय समितीचे सदस्य अख्तर जाफरी; तसेच सलीम अस्लम मुख्तार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. व्यापारी मुफज्जल लहरी (७१) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सर्टिफिकेट दिले नाही :

 लहरी यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये फ्लॅटच्या मालकांकडून २०१ क्रमांकाचा फ्लॅट खरेदी केला. लहरी यांनी अनेकवेळा आरोपी सोसायटी कमिटी सदस्यांना त्यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या नावावर शेअर सर्टिफिकेट हस्तांतरित करण्याची विनंती केली; मात्र लाखोंचे पेंट घेऊनही आरोपींनी तक्रारदाराला शेअर सर्टिफिकेट न देता पोलिसांत जा, असे सांगितले. अखेर लहरी यांनी वांद्रे पोलिसांत धाव घेत आणि आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३८४ (खंडणी) आणि ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या सर्वांना पोलिस लवकरच बोलावून त्यांचा बयाणा नोंदविणार आहेत.

फ्लॅट करायचा होता खरेदी :

लहरी हे फ्लॅटच्या मालकासह, जुलै २०२२ मध्ये सोसायटी कंपाउंडमध्ये सर्व आरोपी सोसायटी पदाधिकाऱ्यांना भेटले. कारण त्यांच्या सोसायटीमध्ये असलेला फ्लॅट क्रमांक २०१ त्यांना विकत घ्यायचा होता. लहरी यांना फ्लॅट खरेदीसाठी बँकेचे कर्ज मिळावे म्हणून अर्ज करण्यासाठी सोसायटीकडून एनओसी हवी होती. त्यावर त्याना एनओसी जारी करण्यात येईल; तसेच शेअर ट्रान्सफर सर्टिफिकेट देखील देऊ; मात्र त्यासाठी इमारत रंगविण्यासाठी जितका रंग लागेल तो तुम्ही द्या, अशी मागणी आरोपींनी केली.

रंग देताच एनओसी :

मात्र रंग मिळेपर्यंत तुम्हाला हवे असलेले कागदपत्र मिळणार नाही, असे आरोपी म्हणाले. त्यानुसार १ ऑगस्ट २०२२ रोजी लहरी आणि साहिल बद्री (फ्लॅटच्या मालकांपैकी एकाचा नातू) हे एका पेंटच्या दुकानात गेले. त्यांनी तिथून ४.२९ लाख रुपयांचे रंग खरेदी करीत सोसायटीला पाठविले. रंगाचे बिल सोसायटीच्या नावावर करण्यात आल्याचे लहरी पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यानंतर, १५ सप्टेंबर २०२२ रोजी आरोपी सोसायटी पदाधिकाऱ्यांनी ‘एनओसी’ दिली. बेस्टमधील १२३ कामगारांना नियुक्ती पत्रे अखेर मिळाली

टॅग्स :मुंबईवांद्रे पश्चिम