पत्रकारांसाठी सन्मान धन योजनेचा आदेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 05:33 AM2019-02-03T05:33:43+5:302019-02-03T05:34:16+5:30
राज्य सरकारने आचार्य बाळशास्री जांभेकर पत्रकार सन्मान धन योजनेचा आदेश शनिवारी जारी केला. त्यामुळे राज्य शासनाकडून पत्रकारांना मासिक सन्मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबई : राज्य सरकारने आचार्य बाळशास्री जांभेकर पत्रकार सन्मान धन योजनेचा आदेश शनिवारी जारी केला. त्यामुळे राज्य शासनाकडून पत्रकारांना मासिक सन्मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील महिन्यापासून योजना लागू होणार आहे.
वृत्तपत्र आणि इतर वृत्त प्रसार माध्यम संस्था यांचे संपादक, ३० वर्षे पत्रकार म्हणून काम केलेले व वय वर्षे ६० पूर्ण झालेले ज्येष्ठ पत्रकार, किमान सलग ३० वर्षे श्रमिक पत्रकार, छायाचित्रकार म्हणून सेवा करून निवृत्त झालेले व किमान ६० वर्षे वय पूर्ण झालेले पत्रकार/छायाचित्रकार, किमान सलग ३० वर्षे स्वतंत्र व्यवसायी पत्रकार/छायाचित्रकार म्हणून काम केलेले व ६० वर्षे पूर्ण झालेल्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
किमान सलग १० वर्षे अधिस्वीकृतीधारक असलेले पत्रकार व वयाची साठ वर्षे पूर्ण झालेले असावेत, अधिस्वीकृतीधारक नसलेल्या पत्रकारांबाबत अधिस्वीकृती पत्रिकेसाठी असलेले निकष पूर्ण करीत असलेले पत्रकार यांचा योजनेसाठी विचार केला जाईल. या बाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी योजनेच्या विश्वस्त मंडळास असेल. या निधीमार्फत सदर योजना राबविली जाणार आहे.
ज्या पत्रकारांना ईपीएफ
योजना (कर्मचारी भविष्य
निर्वाह निधी) व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्रोतातून किंवा निवृत्ती वेतनविषयक लाभ मिळालेले/मिळत नसतील अशा पत्रकारांसाठीच ही योजना लागू असेल. ज्येष्ठ पत्रकार ज्याची उपजिविका केवळ पत्रकारितेवर अवलंबून आहे आणि अन्य कोणत्याही नोकरी/व्यवसाय यामध्ये ते नव्हते वा नाहीत अशांनाच आणि आयकर न भरणाऱ्या पत्रकारांनाच योजनेचा लाभ मिळेल. कोणत्याही गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेली नसावी, ही अटदेखील असेल.