मुंबई : इमारतीच्या गच्चीवर अन्नखाद्य सेवा पुरविण्यासाठीची (उपाहारगृह) परवानगी देण्याबाबत महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात स्थायी समिती सदस्यांनी दंड थोपटले आहेत. याविषयी सभागृहात चर्चा करण्यासाठी महापालिकेची तातडीची सभा बोलाविण्यात यावी, अशी मागणी महापौरांकडे केली आहे. या प्रकरणी एरवी शिवसेनाविरोधी भूमिका घेणाºया आयुक्तांनी शिवसेनेला ‘फेव्हर’ केल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना रवी राजा, राखी जाधव, आसिफ झकेरिया आणि कमजहा सिद्दिकी यांनी लिहिलेल्या पत्रानुसार, मुंबई पालिकेच्या हद्दीतील, अधिकृत वापरण्याजोगा चटईक्षेत्र निर्देशांक शिल्लक नसलेल्या आणि इमारतीच्या गच्चीवरील मोकळी जागा चटईक्षेत्र निर्देशाकांत न पकडलेल्या विद्यमान एकाच आस्थापनाखाली असणाºया इमारतीच्या गच्चीवर अन्नखाद्य सेवा पुरविण्यासाठीची (उपाहारगृह) परवानगी देण्याबाबत अजय मेहता यांनी निर्णय घेतला आहे.पालिकेचे कामकाज पालिका, वैधानिक समित्यांमार्फत होते. नागरिकांशी निगडित धोरणात्मक निर्णय सभागृहाच्या मंजुरीअंती होतात. प्रस्तावाची अंमलबजावणी आयुक्त करतात. त्यांनी निर्णय घेताना नगरसेवकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र आयुक्तांनी तसे केले नाही.>सभागृह हे सर्वोच्च प्राधिकरण असून, सभागृहाचा अधिकार डावलून आयुक्तांनी अशी कार्यवाही करणे उचित नाही. परिणामी या प्रकरणी महापालिकेची तातडीची सभा बोलाविण्यात यावी, या धोरणात्मक बाबीवर चर्चा करून निर्णय घ्यावा, अशा मागणी महापौरांकडे करण्यात आली आहे. आता महापौर यावर काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
गच्चीवरील पार्टीचा मुद्दा पेटणार, महापौरांच्या भूमिकेकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 4:58 AM