Join us

झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवर

By admin | Published: January 15, 2017 5:03 AM

भारतीय जनता पार्टीच्या खासदार पूनम महाजन यांचा मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात, सद्यस्थितीमध्ये पुनर्विकासाचा

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या खासदार पूनम महाजन यांचा मतदार संघ म्हणून ओळख असलेल्या उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात, सद्यस्थितीमध्ये पुनर्विकासाचा मुद्दा ऐरणीवर आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर येथील लोकप्रतिनिधींनी नागरी सेवा-सुविधा पुरवण्यावर भर दिला असला, तरीदेखील झोपड्यांच्या पुनर्वसनासह येथील रस्त्यांच्या कामाला अपेक्षित गती नाही. विशेषत: विमानतळालगतच्या झोपड्यांचा प्रश्नाचे घोंगडे गेल्या कित्येक वर्षांपासून भिजत पडले असून, आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान येथील सगळ्याच समस्या पुन्हा एकदा उफाळून येणार आहेत.मुंबई शहर आणि उपनगराच्या मध्यभागी उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघ येतो. उत्तर-मध्य मुंबई या लोकसभा मतदार संघात, विलेपार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम या विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. विलेपार्ले, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे विधानसभा मतदार संघ बऱ्यापैकी विकसित होत असले, तरी चांदिवली, कुर्ला, कालिना या परिसरातील समस्या आजघडीला म्हणाव्या तशा सुटलेल्या नाहीत, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे. उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदार संघात मराठी, मुस्लीम, ख्रिश्चन, गुजराती आणि दक्षिण भारतीय समाजाचा भरणा असून, येथील लोकप्रतिनिधींना आपापल्या परिसरांचा सर्वसमावेश विकास करण्यासाठी बऱ्यापैकी वाव असल्याचे चित्र, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान तरी स्पष्टपणे दिसत आहे. (प्रतिनिधी)सर्वेक्षण होऊनही प्रश्न प्रलंबितचआंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानतळालगत मोठ्या प्रमाणावर झोपड्या वसलेल्या आहेत. या झोपड्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने झोपड्यांचे सर्वेक्षणदेखील करण्यात आले आहे. झोपड्यांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून स्थानिकांनी प्रशासनावर आंदोलनांसह मोर्चे काढले आहेत. मात्र, अद्यापही झोपड्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही.कुर्ला-अंधेरी रोडचे रुंदीकरण : कुर्ला पश्चिमेकडील अंधेरी पूर्वेला जोडला जाणारा काळे मार्ग कमानी जंक्शनपासून सुरू होतो आणि साकीनाका जंक्शनला संपतो. गेल्या कित्येक वर्षांपासून या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न सुटलेला नाही. हा रस्ता अरुंद असल्याने कमानी, बैलबाजार आणि जरीमरी येथे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते आहे.अतिक्रमण : कुर्ला, कालिना आणि चांदिवली या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत आहेत. नाला असो वा मिठी नदीचा काठ, अशा ठिकाणी अतिक्रमणे केली जात आहेत. विलेपार्ले : विलेपार्ले विधानसभा मतदार संघाची आमदारकी भारतीय जनता पार्टीचे पराग अळवणी यांच्याकडे आहे. विलेपार्ल्यातली वस्ती मराठमोळी असून, या परिसराला सांस्कृतिक वैभव लाभले आहे. मराठी आणि गुजराती समाजाची लोकसंख्या येथे अधिक आहे.चांदिवली : चांदिवली विधानसभा मतदार संघाचे आमदार काँग्रेसचे नसीम खान आहेत. चांदिवली विधानसभा मतदार संघात विविध समाजाच्या लोकांची वस्ती आहे. विशेषत: मुस्लीम बांधवांची वस्ती येथे अधिक असून, मराठी आणि दक्षिण भारतीय हे काही प्रमाणात वास्तव्यास आहेत.कुर्ला : कुर्ला विधानसभेचे आमदार शिवसेनेचे मंगेश कुडाळकर आहेत. कुर्ल्यात मोठ्या प्रमाणावर मुस्लीम बांधवांची वस्ती असून, येथे मराठी, गुजरात आणि मारवाडी बांधवांची वस्तीही मोठ्या प्रमाणावर आहे. कुर्ला परिसरात भंगाराची दुकाने मोठ्या प्रमाणावर असून, येथील भंगाराची बाजारपेठ मोठी आहे.कालिना : कालिना विधानसभा मतदार संघाची आमदारकी शिवसेनेचे संजय पोतनीस यांच्याकडे आहे. कालिना येथे ख्रिश्चन बांधवांची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे, शिवाय मराठी आणि मुस्लिम बांधवांची वस्तीही येथे मोठ्या प्रमाणावर आहे. मुंबई विद्यापीठाची शाखा कालिना येथे असून, येथे विद्यार्थी वर्गाचा मोठा भरणा कायमच असतो. परिणामी, येथील रस्त्यांचा दर्जा आणखी सुधारण्यात यावा, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.वांद्रे पूर्व : वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघाच्या आमदार शिवसेनेच्या तृप्ती सावंत या आहेत. वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघात मराठी वस्ती मोठ्या प्रमाणावर असून, मागील काही वर्षांत येथील परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. मात्र, असे असले, तरी या विधानसभेतील झोपड्यांना अद्यापही पुरेशा नागरी सेवा-सुविधा प्राप्त झालेल्या नाहीत.वांद्रे पश्चिम : वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघाची आमदारकी भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलार यांच्याकडे आहे. आजघडीला वांद्रे पश्चिम हा विभाग बऱ्यापैकी विकसित मानला जातो. या विधानसभा मतदार संघात ख्रिश्चन बांधवांची वस्ती मोठ्या प्रमाणावर असून, मराठी, गुजरात आणि मुस्लीम बांधवांची वस्ती येथे मोठ्या प्रमाणावर आहे.गावठाणांचा प्रश्न सुटेनाकुर्ला पश्चिमेकडील ख्रिश्चन गावासह कालिना आणि वांद्रे येथे मोठ्या प्रमाणात गावठाणे आहेत. गावठाणांच्या पुनर्विकासाठी अद्यापही म्हणावे तसे प्रयत्न झालेले नाहीत. परिणामी, गावठाणांचा पुनर्विकास होणार कधी? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.पदपथही व्यापलेसायनपासून कमानीपर्यंतच्या लाल बहादूर शास्त्री मार्गाचा दोन्हीकडील पदपथ कुर्ला डेपो येथील भंगार विक्रेत्यांनी व्यापला आहे. महत्त्वाचे म्हणजे, येथील पदपथांवर भंगार विक्रेत्यांनी आपला व्यवसाय मांडला असून, गेल्या कित्येक वर्षांपासून ही समस्या सुटलेली नाही.शौचालयाचा प्रश्न ऐरणीवरकुर्ला, कालिना, चांदिवली आणि वांद्रे येथील लोकवस्त्यांमध्ये प्रसाधनगृहांची कमतरता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्राधान्याने आता शौचालयांच्या नूतनीकरणावर भर दिला आहे. परिणामी, महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक शौचालयांचे नूतनीकरण वेगाने होत असून, स्वच्छ शौचालयांमुळे स्थानिकांना काही प्रमाणात का होईना, दिलासा मिळाला आहे.प्रदूषित मिठीमिठी नदीच्या रुंदीकरणासह खोलीकरणाचा प्रश्न मार्गी लागत असला, तरी मिठी नदीमध्ये लगतच्या कारखान्यांमधून रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात आहे, यावर कोणाचेही बंधन नाही. परिणामी, प्रदूषित मिठी नदी आणखी प्रदूषित होत असून, त्याचा फटका जलचरांसह लगतच्या रहिवाशांना बसत आहे.मिठीभोवताली अतिक्रमणमिठी नदीच्या काठी काही ठिकाणी अतिक्रमण होत आहे. विशेषत: लाल बहादूर शास्त्री मार्गावरून कालिनासह सांताक्रुझ आणि वांद्रे-संकुलाकडे प्रवास करताना, मिठीच्या नदीकाठी भंगारवाल्यांनी केलेले अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेने काहीच पावले उचलली नाहीत.डम्पिंग आणि कचराकुर्ला येथील मिठी नदीच्या काठी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. परिणामी, मिठी नदीच्या काठाला डम्पिंगचे स्वरूप येत असून, डम्पिंगचा प्रश्न वाढत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.लोकवस्त्यांची नागरी स्वच्छता : कुर्ला, कालिना, चांदिवली आणि वांद्रे या परिसरात मोठ्या प्रमाणावर झोपड्या पसरलेल्या आहेत. येथील लोकवस्त्यांमधील गटारे, शौचालयाची टाकी, छोटे नाले, मोठे नाले अस्वच्छ आहेत. काही ठिकाणी तर गटारे आणि शौचालयाच्या टाक्या तुंबल्याने स्थानिक परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, लोकवस्त्यांची नागरी स्वच्छता हा प्रश्न नगरसेवकांनी सोडवायचा असून, आजही ही समस्या निकाली लागलेली नाही.मंडई पुनर्विकास : कुर्ला, कालिना आणि चांदिवली येथे महापालिकेच्या मंडई आहेत. काही मंडईच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला असला, तरी कुर्ल्यातील बहुतांश मंडई पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी, येथे खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्रास होत आहे.दरडीवरील झोपड्या : कुर्ल्यात जरीमरी येथील टेकडीलगत आणि टेकडीवर मोठ्या प्रमाणात झोपड्या वसल्या आहेत. या झोपड्यांना नागरी सेवा सुविधा पुरेशा प्रमाणात पुरवल्या जात नाहीत, शिवाय त्यांच्या संरक्षणाबाबतही काहीच पावले उचलण्यात आलेली नाही. परिणामी, या झोपड्यांतील रहिवासी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत.कोळीवाडे : वांद्रे पश्चिमेकडील कोळीवाड्यांचा मुद्दा ऐरणीवर आहे. येथील नागरी सेवा सुविधांसह कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी, हा प्रश्न मार्गी कधी लागणार? याकडे कोळीबांधवांचे लक्ष लागून राहिले आहे.