मुंबईतील धोकादायक इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, सात वर्षांत तीनशे लोकांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 02:53 AM2020-07-17T02:53:44+5:302020-07-17T06:56:30+5:30
दरवर्षी मुंबईत पावसाळ्याआधी पालिकेमार्फत मुंबईतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार करण्यात येते.
मुंबई : मुसळधार पावसात इमारत कोसळण्याच्या दोन घटनांनी मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न गुरुवारी पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सात वर्षांमध्ये ३९४५ इमारत दुर्घटनांत तीनशे निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. मात्र या वर्षी मार्च महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने अन्य पावसाळीपूर्व कामे लांबणीवर पडल्याने धोकादायक इमारतींचा धोका अधिकच वाढल्याने मुंबईतील अशा हजारो धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
दरवर्षी मुंबईत पावसाळ्याआधी पालिकेमार्फत मुंबईतील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार करण्यात येते. त्यानुसार अशा धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना चेतावनी देऊन इमारत खाली करण्याबाबत सूचना केली जाते. मात्र अनेक वेळा डोक्यावरील छप्पर जाण्याच्या भीतीने नागरिक धोकादायक इमारतीमध्येच जीव मुठीत घेऊन राहत असतात. या इमारतींची आवश्यक डागडुजी पावसाळ्यापूर्वी न झाल्यास दुर्घटनेची शक्यता असते. मात्र या गंभीर विषयाकडे दरवर्षी दुर्लक्ष केले जाते. यामुळे दरवर्षी पावसाळ्यात इमारत अथवा इमारतीचा भाग कोसळून लोकांना नाहक जीव गमवावा लागतो.
गेले दोन दिवस मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका गुरुवारी बसला. मालाड येथील चाळीचा भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दुपारी फोर्ट येथील सव्वाशे वर्षे जुनी इमारत कोसळली. गेल्या वर्षी २०१९ मध्ये घर - घरांच्या भिंती, इमारती - इमारतींचे भाग कोसळण्याच्या ६२२ घटनांमध्ये ५१ लोकांचा मृत्यू झाला होता, तर २२७ लोक जखमी झाले. यामध्ये डोंगरी येथील भीषण इमारत दुर्घटनेचा समावेश आहे. या वर्षी मुसळधार पावसामुळे पुन्हा मुंबईतील धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर संकट ओढावले आहे.
दोन जखमी जे.जे रुग्णालयात
फोर्ट येथील भानुशाली इमारत दुर्घटनेतील बालचंद्रा कामडू (४८) व नेहा गुप्ता (४५) या महिला जखमींवर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे. तर दोन महिलांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह जे. जे. मध्ये आणले आहेत, अशी माहिती जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली.
१२ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले
फोर्ट येथील उपकरप्राप्त भानुशाली इमारत दुर्घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत येथील मदतकार्य सुरू होते. ८ फायर इंजीन, २ रेस्क्यू व्हॅन, ५० कामगार, ६ जेसीबी, १० डंपर्स यांच्या मदतीने येथे शोधकार्य सुरू होते. सायंकाळी ७ वाजेपर्यंत इमारतीच्या दुसºया बाजूस अडकलेल्या १२ लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इकबाल सिंह चहल आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी घटनास्थळाला भेट देत स्थानिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. रात्री दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या तिसºया मजल्यावर अडकलेल्या एका व्यक्तीला अग्निशमन दलाकडील उंच शिडीच्या मदतीने खाली उतरवत वाचविण्यात आले.
पालिका क्षेत्रात ४४३ अतिधोकादायक इमारती
मुंबई महापालिका क्षेत्रात तब्बल ४४३ अतिधोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे. यामध्ये खासगी आणि पालिकेच्या अखत्यारितील इमारतींचा समावेश आहे. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. यामध्ये ५२ इमारती पालिकेच्या मालकीच्या असून सर्वाधिक धोकादायक इमारती घाटकोपर परिसरात आहेत.
इमारत रिकामी केली होती. काही लोक परत आले होते, असे समजते. मात्र आता शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. मदतकार्य वेगाने सुरू असून, स्थानिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- इकबाल सिंह चहल,
मुंबई महापालिका, आयुक्त
लोकांना सुरक्षितस्थळी नेण्याचे काम आम्ही करत आहोत. मात्र अशा प्रकरणात मालकाने निष्काळजीपणे वागू नये. मालकाने लोकांना सुरक्षितस्थळी हलविणे गरजेचे होते. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
- किशोरी पेडेणेकर, महापौर
इमारतीची दुरुस्ती सुरू असताना इमारत कोसळली. लगतच्या लोकांना भीती वाटते. अशा प्रकरणांत वेगाने आणि तत्काळ तोडगा काढण्याचे काम घेत स्थानिकांना दिलासा दिला पाहिजे.
- अरविंद सावंत,
खासदार, शिवसेना
मुंबईत १६ हजार इमारती धोकादायक आहेत. महिनाभरात या १६ हजार इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. या इमारतींबाबत अनेक अडथळे असतात. मात्र सर्वांशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.
- जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माणमंत्री