जागतिक रंगभूमी दिन विशेष
राज चिंचणकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षी जागतिक रंगभूमी दिनाच्या तोंडावरच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागला आणि नाट्यसृष्टीला वर्षभर त्याचा मोठा फटका सहन करावा लागला. नाट्यगृहांवरच पडदा पडल्याने, सगळी नाटके थेट विंगेत जाऊन पोहोचली. याबाबत काही सकारात्मक घडेल, या आशेवर असतानाच आणि नाट्यसृष्टी आता नव्याने उभारी घेण्याच्या प्रयत्नात असताना, यंदाचा जागतिक रंगभूमी दिन येऊनही ठेपला. आता मराठी नाटक अनलॉक होण्याच्या प्रक्रियेत नाट्यसृष्टीत प्राण फुंकले गेल्याचे चित्र दिसत असले, तरी या मार्गातही विविध प्रश्नांचे जाळे विणले गेले आहे. पण तरीही, नाट्यगृहांचा पडदा उघडताच नाट्यसृष्टीत विविध प्रयोगांचे अंक रंगू लागले आहेत.
‘नाटक’ हा मराठी रसिकजनांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. नाटककार, दिग्दर्शक, निर्माता, कलावंत, तंत्रज्ञ व पडद्यामागे नाट्यप्रयोगाची धुरा सांभाळणारी नाटकमंडळी या सर्वांचे मोठे योगदान नाट्यसृष्टीत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे या सर्वांच्या आशा, अपेक्षांवर मर्यादा आल्या आणि त्याचा परिणाम एकूणच नाट्यव्यवसायावर झाला. नाटक अनलॉक होण्याच्या प्रक्रियेत, व्यावसायिक रंगभूमीपासून प्रायोगिक रंगभूमीवरील रंगकर्मींनीही कंबर कसली आणि नाट्यगृहे पुन्हा जिवंत झाली. आता प्रश्न होता तो रसिकजन नाट्यगृहांकडे वळतील का याचा! मात्र अलीकडच्या काळात काही नाटके रंगभूमीवर आली आणि रसिकांनी पुन्हा एकदा नाट्यगृहांकडे पावले वळवली. परंतु असे असले, तरी बालरंगभूमी मात्र अजूनही विंगेतच आहे. बालनाट्ये सादर करण्यास अद्याप परवानगी मिळाली नसल्याने, बच्चेमंडळी मात्र नाटकांपासून दुरावली आहेत.
गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनमुळे बंद झालेली नाट्यगृहे पुन्हा उघडण्यास डिसेंबरची वाट पाहावी लागली. जानेवारीपासून नाट्यसृष्टीत मोठ्या घडामोडी दिसून आल्या. याचा परिणाम म्हणून यंदाच्या मार्चमध्ये काही नव्या नाट्यकृतींनी रंगभूमीवर धडाक्यात ‘एन्ट्री’ घेतली. पण, इथेही एक गडबड होतीच. नाटकाकडे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून ज्या मंडळींची वाटचाल सुरू होती; त्यांच्यापुढे नाट्यगृहांतील ५० टक्के प्रेक्षक क्षमतेचा प्रश्न उभा ठाकला. काही सन्माननीय रंगकर्मी व त्यांची नाटके सोडली; तर तिकीटबारीवर अपेक्षेइतक्या लाल फुल्या उमटत नसल्याची चिंता अनेक निर्मात्यांना आजही आहे.
* १०० टक्के क्षमतेने नाट्यगृहे केव्हा सुरू होतील, यावर प्रश्नचिन्हच!
नाट्यगृहांच्या भाड्यात सध्या सवलत मिळत असली, तरी ५० टक्क्यांच्या हिशेबात नाटके चालवण्याची वेळ सर्वच निर्मात्यांवर सध्या येऊन ठेपली आहे. कोरोनाचे संकट निदान आतातरी टळेल, या अपेक्षेत असलेल्या नाटकमंडळींची नव्याने परीक्षा घेण्याचे काम सध्या कोरोना करत आहे. परिणामी, १०० टक्के क्षमतेने नाट्यगृहे केव्हा सुरू होतील, यावर दाट प्रश्नचिन्हच आहे. मात्र नजीकच्या काळात सकारात्मक काही घडले, तर नाट्यप्रवाहातील अडचणी दूर होऊन आणि सभोवती विणल्या गेलेल्या जाळ्यातून नाट्यसृष्टी सहीसलामत बाहेर पडू शकेल.
............................