लोकसभेचे मुद्दे विधानसभेला गायब?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 12:54 PM2024-11-06T12:54:00+5:302024-11-06T12:54:21+5:30

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणूक मुद्द्यांभोवती निवडणूक फिरत होती, ते मुद्दे विधानसभेच्या निवडणुकीत गायब झाल्याचे आता दिसत आहे. मुंबईच्या सर्वच मतदारसंघांत असे चित्र असून कोणत्याही पक्षाच्या प्रचारात यापैकी कोणताच ठोस मुद्दा प्रचारात मांडण्यात जात नसल्याचे चित्र आता दिसते आहे.

Issues of the Lok Sabha disappear to the Legislative Assembly? | लोकसभेचे मुद्दे विधानसभेला गायब?

लोकसभेचे मुद्दे विधानसभेला गायब?

मुंबई -  लोकसभा निवडणूक मुद्द्यांभोवती निवडणूक फिरत होती, ते मुद्दे विधानसभेच्या निवडणुकीत गायब झाल्याचे आता दिसत आहे. मुंबईच्या सर्वच मतदारसंघांत असे चित्र असून कोणत्याही पक्षाच्या प्रचारात यापैकी कोणताच ठोस मुद्दा प्रचारात मांडण्यात जात नसल्याचे चित्र आता दिसते आहे. उत्तर - पूर्व मुंबईत गुजराती - मराठी वाद, धारावीतील अपात्र रहिवाशांचे मुलुंडमधील पुनर्वसन, कांजूर मार्ग डंपिंग ग्राउंड, मिठागरांच्या जमिनी हे मुद्दे लोकसभेच्या प्रचारातील मुख्य मुद्दे बनले होते. मुलुंडमध्ये पुनर्वसन होऊ दिले जाणार नाही, असे आश्वासन सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी दिले होते. या मुद्द्यावर मुलुंडमधील वातावरण चांगलेच तापले होते. मात्र, लोकसभा निवडणूक संपल्यानंतर हा मुद्दा थंड झाल्याचे दिसत आहे. 

कांजूर डंपिंग ग्राउंडचा मुद्दा तर आतापर्यंत दर निवडणुकीचा मुद्दा झाला होता. मात्र, अजूनही हे डंपिंग ग्राउंड सुरूच आहे. याबाबतचा करार ज्या दिवशी संपेल त्या दिवशी कराराचे नूतनीकरण होऊ दिले जाणार नाही आणि डंपिंग ग्राउंड कायमचे बंद करू, असे आश्वासन लोकसभेला महाविकास आणि महायुतीच्या उमेदवारांनी दिले होते. मात्र, डंपिंग ग्राउंडची मुदत संपण्यास अजून बरीच वर्षे आहेत. मात्र तरी यंदाही निवडणुकीत डंपिंग ग्राउंडचा मुद्दा पुन्हा प्रचारात येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मिठागरांच्या जमिनीवर प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन, घरबांधणी हा मुद्दा अजून तसा फारसा तापलेला नाही आणि स्थानिक जनताही त्याविषयी फार सजग नसल्याचे जाणवते. त्यामुळे हा मुद्दाही निवडणुकीत किती फटेज घेईल. याविषयी अनिश्चितता आहे.

उत्तर मध्य मुंबईत दरडींवरील झोपड्यांचे पुनर्वसन, मिठी नदी विकासकामे, विमान उड्डाण क्षेत्रातील (फनेल झोन) जुन्या इमारतींचा पुनर्विकास हे मुद्दे लोकसभेला चर्चेत होते. फनेल झोनचा मुद्दा प्रत्येक निवडणुकीचा विषय झाला आहे. दक्षिण मध्य मुंबईत धारावी पुनर्वसन हा मुद्दा मुख्य अजेंड्यावर होता. विधानसभेला तो पुन्हा तेजीत येईल, अशी चिन्हे आहेत. अजून तरी प्रचाराचा मुख्य रोख स्पष्ट झालेला नाही. येत्या काही दिवसांत प्रचाराला नेमकी कोणती दिशा मिळते त्यावरून कोणते मुद्दे ऐरणीवर येणार हे स्पष्ट होईल. 

Web Title: Issues of the Lok Sabha disappear to the Legislative Assembly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.