'गृहमंत्र्यांनी त्या घटनेची दखल न घेणे संतापजनक, पुण्यात आले अन् नौटंकी करुन गेले'
By महेश गलांडे | Published: January 2, 2021 06:12 PM2021-01-02T18:12:16+5:302021-01-02T18:15:42+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी सकाळीच पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस दलाचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी गृहमंत्र्यांनी पुणे कार्यालयातील कंट्रोल रुमला भेट दिली
मुंबई - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुणेकरांना सुखद धक्का दिला. विविध तक्रारींसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या पुणेकरांना गृहमंत्र्यांनी स्वत: उत्तर दिलं. "हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय. तुमची तक्रार काय आहे? असं म्हणत तक्रारी लिहून त्यांनी संबंधित विभागातील पोलीस स्टेशनमध्ये कळवल्या. मात्र, गृहमंत्र्यांची ही कार्यतत्परता म्हणजे नौटंकी असल्याची टीका पुण्यातील भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ यांनी पुण्यातील एका तरुणीवर झालेल्या बलात्काराचा दाखला देत गृहमंत्री पुण्यात आले अन् नौटंकी करुन गेले, असेच म्हटलं.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी सकाळीच पुणे पोलीस आयुक्तालयात हजेरी लावली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोलीस दलाचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी गृहमंत्र्यांनी पुणे कार्यालयातील कंट्रोल रुमला भेट दिली. यावेळी पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत केक कापत त्यांनी नवीन वर्षाचं स्वागत केलं. तसेच वायरलेसवरुन कर्मचाऱ्यांशी संवाद साधत शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: काही फोन कॉल्सना उत्तरही दिलं. मात्र, गृहमंत्र्यांनी पुण्यात येऊन केवळ नाटक केलं, अशी टीका चित्रा वाघ यांनी केलीय.
महिला सक्षमीकरण...सशक्तीकरण या घोषणा हवेतचं विरल्या...राज्यातल्या लेकीबाळींवर बलात्कार होताहेत आणि त्याची खुद्द गृहमंत्र्यांनी दखल न घेणं हे संतापजनक आहे @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mipravindarekar@BJP4Maharashtra@MahaPolice@ChDadaPatil@abpmajhatv@TV9Marathi@News18lokmat
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 2, 2021
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गृहमंत्र्यांच्या पुणे दौऱ्याचा उल्लेख केला. 'राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुण्यात जाऊन पोलीस कंट्रोलरूमला भेट देत पुणेकरांच्या तक्रारी ऐकण्याची नौटंकी केली. मात्र, त्याच पुण्यात ३१ तारखेला खराडी कॉल सेंटरमध्ये काम करणार्या २० वर्षीय तरुणीची गाडी अडवून मारहाण करत तिच्यावर बलात्कार झाला याची साधी दखलही घेतली नाही, अशी आठवणही वाघ यांनी गृहमंत्र्यांना करुन दिली. महिला सक्षमीकरण...सशक्तीकरण या घोषणा हवेतचं विरल्या...राज्यातल्या लेकीबाळींवर बलात्कार होताहेत आणि त्याची खुद्द गृहमंत्र्यांनी दखल न घेणं हे संतापजनक आहे, अशी टीकाही वाघ यांनी केली.
पुण्यातील येरवडा कारागृहास गृहमंत्र्यांची भेट
पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहास भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी तेथील कैद्यांशी संवाद साधत त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. आमच्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविल्याने येरवडा सह राज्यातील सर्वच कारागृहांत कोरोनाच्या संक्रमणावर नियंत्रण ठेवता आले. या कामगिरी बद्दल मी सर्वांचे पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने अभिनंदन करतो. काही दिवसांपूर्वीच पोलिसांसाठी १ लाख घरं बांधण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडला आहे. तसेच येत्या काळात आधुनिक कारागृह उभारण्याचाही आमचा मानस आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलंय.
उपाययोजना राबविल्याने येरवडा सह राज्यातील सर्वच कारागृहांत कोरोनाच्या संक्रमणावर नियंत्रण ठेवता आले. या कामगिरी बद्दल मी सर्वांचे पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख नात्याने अभिनंदन करतो. काही दिवसांपूर्वीच पोलिसांसाठी १ लाख घरं बांधण्याचा प्रस्ताव (२/३) pic.twitter.com/RXCD9SYmBr
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 2, 2021