Join us  

महिलांचे माहेरी जाणे झाले स्वस्त; मुंबई विभागातून ८४ हजार महिलांचा हाफ तिकीट प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:10 AM

देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली.

मुंबई : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने १७ मार्चपासून महिला सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. मुंबई विभागात आठवड्याभरात महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे.

देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली. आर्थिक संकटात असलेल्या एसटीला बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सन्मान योजना सुरू करण्यात आली.  त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही भर पडेल. मुंबई विभागात ८४,५५९ महिलांनी हाफ तिकिटाचा लाभ घेतला असून त्यामुळे ३०.४३ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

कोरोना आणि संपामुळे एसटी प्रवाशांनी अन्य वाहतुकीचा  पर्याय शोधला आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत घट झाली होती. मात्र, अमृत योजना आणि सन्मान योजना यावेळी प्रवासी वर्गात मोठी भर पडणार आहे. महिलांचा सुरूवातीपासूनच या योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एसटी महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अनेक बसस्थानकांवर झळकत असलेले बसफेऱ्यांचे वेळापत्रक प्रवाशांची दिशाभूल करणारे ठरत आहे. तर दुसरीकडे एसटीच्या कित्येक गाड्यांची अवस्था चांगली नाही. त्यामुळे प्रवासी प्रवास करणे टाळतात. त्याकडे एसटी महामंडळाने लक्ष देणे गरजेचे आहे. - नम्रता गवळे, प्रवासी 

गोरगरीब महिलांना बाहेरगावी जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. सरकारच्या या ५० टक्के सवलतीच्या निर्णयामुळे त्यांना फायदा होईल. तसेच महिलांना माहेरी जाणेही सोपे होईल. - सुजाता बडदे, प्रवासी 

महिला सन्मान योजनेमुळे नियमित महिला प्रवाशांसोबत इतर महिलांची  संख्या वाढेल. नोकरदार महिला एसटीकडे वळतील. ज्या महिला भाडे जास्त असल्याने प्रवास करत नव्हत्या त्याही करतील. - शेखर चन्ने,  व्यवस्थापकीय संचालक,  एसटी महामंडळ

टॅग्स :महिलामहाराष्ट्र