Join us

हवी तशी शाडूची देवी मूर्ती मिळणे झाले कठीण; ऑर्डर घेण्यास मूर्तिकारांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2023 8:38 PM

हव्या तशा आणि जास्त उंचीच्या देवीच्या शाडू मूर्ति मिळणे देवीभक्तांसाठी कठीण होत आहे. 

श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबईनुकताच पार पडलेला गणेशोत्सव आणि परतीच्या पावसाने जोर धरल्याने शाडू मातीच्या देवी मूर्ती साकारण्यास मूर्तिकारांकडे कमी दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शाडू मातीची देवी मूर्तीची ऑर्डर घेण्यास मूर्तिकारांनी नकार दर्शविला आहे. त्यामुळे हव्या तशा आणि जास्त उंचीच्या देवीच्या शाडू मूर्ति मिळणे देवीभक्तांसाठी कठीण होत आहे. 

गणपतीप्रमाणे नवरात्रौत्सवात देवीची मूर्ती शाडूची असावी असा आग्रह धरणारा मोठा वर्ग आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सव प्रमाणे घराघरात ही देवी मूर्ती बसविण्याचे प्रमाण काही समाजात अधिक आहे. त्यामुळे देवी मूर्तीची मागणी अधिक असते. अशात पूजेसाठी देवीची शाडूचीच मूर्ती असावी अशी मागणी आहे.

मात्र, मूर्तिकारांना चार फुटापेक्षा मोठ्या शाडूच्या देवी मुर्त्या कमी दिवसात साकारणे आणि मूर्ती सुकण्यासाठी आवश्यक कालावधी, वातवरण सध्या नाही. अशात देवी मूर्तीत बारा हात साकारताना मूर्ती व्यवस्थित सुकावी लागते. त्यासाठी सुद्धा वेळ लागतो. त्यामुळे शाडू मूर्तीची ऑर्डर घेण्यास मूर्तिकारांमध्ये उत्साह नाही. परिणामी हवी तशी आणि हवी तेवढ्या उंचीची मूर्ती मिळणे देवी भक्तांसाठी कठीण होत आहे. 

मोठ्या कारख्यात जरी मुर्त्या मिळत असल्या तरी मूर्तीचे वाढीव भाव सर्वसामान्य देवीभक्तांना आणि मंडळांना परवडणारे नाही. देवीची विविध रूपे आणि अलंकार साकारताना शाडू मूर्तीपेक्षा पीओपीमध्ये लवकर शक्य होते. शिवाय नवरात्रोत्सवासाठी कमी दिवस शिल्लक आहेत. त्यात पाऊस सुरु आहे. त्यामुळे शाडूपेक्षा पीओपी मूर्तीला आम्ही प्राध्यान्य देत असल्याचे मूर्तिकार वायंगणकर यांनी सांगितले.

टॅग्स :नवरात्रीमुंबई