लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे ड्रोन उडवणे सोपे झाले असले, तरी त्यासाठी परवानगी मिळवण्याची प्रक्रिया बरीच किचकट आहे. त्यात जोपर्यंत सुलभता येत नाही, तोपर्यंत भारत ड्रोनबाबतीत ‘ग्लोबल हब’ म्हणून नावारूपास येण्याचे इप्सित साध्य होणार नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
प्रत्येक क्षेत्रात ड्रोनचा वापर करून रोजगार निर्मितीसह नवक्रांती घडविण्याचा मानस हवाई वाहतूकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. ते सहज शक्य आहे. कारण ड्रोनमुळे अनेक अशक्यप्राय गोष्टी शक्य होतात. म्हणजे जमिनीच्या थ्रीडी मॅपिंगपासून ते महापुरात मदतकार्य राबविण्यासाठी ड्रोनचा वापर सध्या केला जातो. नव्या धोरणानुसार ड्रोनसाठी २५ ऐवजी ५ अर्ज सादर करावे लागतील. मात्र, मुंबईसारख्या शहरात व्यावसायिक हेतूने ड्रोन उडवायचा झाल्यास ७५ टक्क्यांहून अधिक वेळा नकारच मिळतो. त्यामुळे अर्जांची संख्या कमी करून उपयोग नाही, तर परवानगी प्रक्रियेतील अडचणी कमी केल्या पाहिजेत, असे मत या विषयातले तज्ज्ञ सौरभ भाट्टीकर यांनी व्यक्त केले.
सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टिकोनातून ड्रोनवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रालयाकडून 'डिजिटल स्काय प्लॅटफॉर्म'ची स्थापना करण्यात येणार आहे. तो मानवरहित आणि सेल्फ इंटरॅक्टिव्ह असेल. जोपर्यंत हा प्लॅटफॉर्म कार्यान्वित होत नाही, तोपर्यंत ड्रोन वापरातील अडथळे दूर होणार नसल्याचे मत भाट्टीकर यांनी मांडले.
..............
इंडिव्हिज्युअल ड्रोन फ्लायर्सना खूप समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे शक्य असेल तिथे ऑन दी स्पॉट परवानगी दिली गेली पाहिजे. किमान ग्रीन झोनमध्ये तरी कोणतेही अडथळे नसावेत. ट्रॅव्हल आणि कमर्शिअलला वेगवेगळे प्राधान्य दिले पाहिजे.
- सौरभ भाट्टीकर, ड्रोन विषयातले तज्ज्ञ
............
परवानगी कोण देतो?
ड्रोन उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर डीजीसीएकडून परवाना (लायसन्स) जारी केला जातो. त्याचे शुल्क साधारणपणे ६० हजारांच्या आसपास असते. मुंबईत ड्रोन उडवायचा झाल्यास पोलीस आयुक्त कार्यालयात अर्ज करावा लागतो. पूर्णतः छाननी झाल्यानंतर अटी-शर्तींनुसार परवानगी दिली जाते. त्यांचे उल्लंघन केल्यास १ लाखापर्यंत दंड वा शिक्षा होऊ शकते. शिवाय ड्रोन जप्तही केला जातो.
..............
कोणकोणत्या क्षेत्रात होतो वापर?
सुरक्षा सेवा, वन संवर्धन, कृषी क्षेत्र, महापूर किंवा आपत्कालीन स्थितीत बचावकार्य, त्याशिवाय लग्न समारंभ, राजकीय मेळावे, चित्रीकरण स्थळांवर ड्रोनचा वापर होतो.