Join us

मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरून रंगली राजकीय टोलवाटोलवी; विरोधक मात्र आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 5:14 PM

राज्य सरकारची सावध भूमिका

मुंबई :  सर्वसामान्य नागरिकांनाही लोकल प्रवासाची मुभा मिळावी अशी मागणी होत असली तरी राज्य सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. लोकलच्या प्रश्नावर भाजपने काही दिवसांपुर्वी सुरू केलेली आंदोलने थंडावली आणि सविनय नियमभंगाची मोहिमही बारगळली. त्यावरून काँग्रेसने दुटप्पीपणाचा आरोप करत भाजपची खिल्लीबश्र उडवली आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी आज भाजपच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ''भाजपने २ आॅगस्टला जाहीर केलेल्या सविनय नियमभंग आंदोलनातून पळ काढला.

ब्रिटिशांविरुद्ध सविनय कायदेभंग आंदोलन देश करत होता तेव्हाही पळ काढला होता. प्रामाणिकपणा तेव्हाही नव्हता आताही नाही. जनतेच्या जीवावर आंदोलन करणार होते. दुटप्पी भाजपाला ओळखलेली जनता आमच्याबरोबर आहे'' असे सावंत म्हणाले. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडात जनतेची काळजी असल्याचे सांगत भाजपवाले कावडयात्रा रद्द करतात. पण, महाराष्ट्रात मात्र लोकांच्या आरोग्याची काळजी न करता उलट भूमिका घेतात, असा आरोप केला.

यावर, भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लोकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांना छळायचे आणि आंदोलन झाले की मजा बघायची असा उरफाटा कारभार असल्याचा पलटवार केला. सावंत यांच्या विधानांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसला सामान्य मुंबईकरांना छळण्यात कसा विकृत आनंद मिळतो हे दिसले. 

आम्ही योजना बदलली आणि पितळ उघडे पडले. सामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासावरून काल हायकोर्टाने थपडा मारल्या तरी तुमच्या सरकारला जाग आली नाही. आंदोलन तर होईलच. सामान्य मुंबईकरांच्यासाठी. महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून मिरवतापण सामान्य मुंबईकराच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेण्याच्या ऐवजी कुचेष्टा करता हेही जनता पहाते आहे, असे उपाध्ये म्हणाले.

दरम्यान, मनसेने लोकल प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. लोकल बंद आहेत बस ला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण "शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे आपण हे करू शकता आमचा सीएम जगात भारी, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

टॅग्स :लोकलमहाराष्ट्र सरकार