Join us

'माझ्या भाषणांचा विपर्यास झाला, मी त्याची लिंक पाठवतो'; भाजपा- मनसे युतीच्या हालचाली सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 10:58 AM

भाजपा मनसेच्या साथीने शिवसेनेला शह देण्याचा मनसुबा रचत असल्याची माहिती समोर येत आहे. 

मुंबई: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपाची युती 25 वर्षांहून अधिक काळ टिकली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने या आपल्या जुन्या मित्राची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे आता महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपाला एका मित्रपक्षाची गरज आहे. तसेच भाजपा मनसेच्या साथीने शिवसेनेला शह देण्याचा मनसुबा रचत असल्याची माहिती समोर येत आहे. 

एबीपी माझाच्या वृत्तानूसार, मागील वर्षी मनसेने पक्षाचा झेंड्याचा रंग बदलत आपली हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यातच शिवसेनेच्या हिंदुत्वावर सध्या प्रश्न चिन्ह उपस्थित होत असताना येत्या निवडणुकीत मनसेसोबत प्रत्यक्ष किंव्हा अप्रत्यक्षपणे हातमिळवणी करण्याचा मानस भाजपाचा असून, ठाणे, नवी मुंबई, नाशिक तसेच मुंबई, यासारख्या महत्वाच्या पालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करतील असे देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपा- मनसेच्या युतीबाबत संकेतही दिले आहेत. आम्ही जर रयत संघटना आणि इतरांना मान देऊ शकतो, तर  मनसेप्रमुख राज ठाकरे हे मोठं नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजपा कोअर टीम निर्णय घेईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी देत भाजप-मनसे एकत्र येण्याचे संकेत दिले.

Raj Thackeray: भाजपासोबत जाणं हा मनसेसाठी 'राज'मार्ग ठरेल?, 'इंजिन'ही धावेल की 'कमळ'च फुलेल?

तत्तपूर्वी, राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आधी नाशकात आणि आता पुण्यात ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. पण, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबतची त्यांची 'भेट' नवी 'गाठ' बांधणारी ठरणार का, याबद्दल राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. आत्तापर्यंतच्या बहुतांश निवडणुकांमध्ये 'एकला चालो रे' म्हणणारे राज ठाकरे भाजपाचा हात धरणार का, 'लाव रे तो व्हिडीओ'मध्ये दाखवलेल्या व्हिडीओंचं भाजपा काय करणार, यावरून तर्कवितर्क सुरू झालेत आहेत.

राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या लिंक पाठवणार- 

मनसे आणि भाजपा भविष्यात एकत्र येतील अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. मात्र राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत सुरुवातीच्या काळात घेतलेली भूमिका यामुळे उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याच्या भीतीने भाजपा मनसे सोबत जाण्यास तयार नव्हते. तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी जर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली तर नक्की विचार होऊ शकतो असे सांगितले होते. मात्र आज खुद्द राज ठाकरे यांनीच चंद्रकांत पाटील यांना सांगितलं की, त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंकही राज ठाकरे त्यांना पाठवणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :राज ठाकरेचंद्रकांत पाटीलमनसेभाजपामहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस