Sanjay Raut: उत्तर प्रदेशातील लखीमपुरात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्यानं झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर संबंधित परिसरात सरकारविरोधातील रोष वाढला आहे. या प्रकरणानंतर आता देशभर संतापाची लाट उसळताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांना चिरडणं ही भाजपा आणि पंतप्रधान मोदींची अधिकृत 'पॉलिसी' आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
''शेतकरी लोकशाही पद्धतीनं आंदोलन करत आहेत. देशाच्या लोकशाही पद्धतीचं आपण जगाला उदाहरणं देतो आणि शेतकऱ्यांवर अशा पद्धतीनं चिरडण्याची कामं देशात केली जातात. उत्तर प्रदेशात सध्या आंदोलनांना चिरडण्याची नवी प्रथाच सुरू झाली आहे. तर विरोधकांना अशा ठिकाणी पोहोचण्यापासून पीडितांची भेट घेण्यापासून रोखण्याचा नवा खेळ उत्तर प्रदेश सरकारनं सुरू केल्याचं आपण गेल्या काही प्रकरणांपासून पाहत आलो आहोत. प्रियांका गांधींना रोखण्यात आल्याचं मला कळालं. भाजपानं काय शेतकऱ्यांना चिरडण्याची अधिकृत पॉलिसीचा स्वीकार केलाय का? हे त्यांनी सांगावं", असं संजय राऊत म्हणाले.
शेतकऱ्यांची पंगा घेऊ नका..."शेतकऱ्यांशी तुम्हाला पंगा घ्यायचा आहे का? तसं असेल तर खुशाल शेतकऱ्यांना विरोध करा मग बघा देशभरात काय होईल तेही पाहा. शेतकरी तुमच्या विरोधात असतील पण ते काय देशद्रोही आहेत का? त्यांना असं चिरडणं म्हणजे ब्रिटीश सरकारी वागणूक तुम्ही देत आहात. मुंबईत बाबू गेनूनं ब्रिटीशांना विरोध करताना त्यांच्या ट्रक खाली झोपून आंदोलन केलं होतं. त्यावेळी ब्रिटीशांनी त्याच्या अंगावरुन ट्रक चालवला होता. उत्तर प्रदेशातही अशाच पद्धतीचा प्रकार करण्यात आला आहे", असं संजय राऊत म्हणाले.