मुंबई : पाच वर्षीय मुलीवर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यास सावत्र वडिलांना चिथविल्याप्रकरणी मुलीच्या आईला ठोठाविण्यात आलेली शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द केली. घटनेचा गुन्हा नोंदविण्यास विलंब झाला, याचा अर्थ मुलीच्या आईने हेतुपूर्वक तिच्या पतीला पॉक्सोअंतर्गत गुन्ह्यात मदत केली, असा होत नाही, असे म्हणत न्या. एस.एम. बदर यांच्या खंडपीठाने २८ वर्षीय महिलेची सुटका केली.बघ्याची भूमिका घेतली, म्हणजे गुन्ह्यास प्रवृत्त केले, असा अर्थ या कायद्यांतर्गत काढता येणार नाही, असेही न्या. बदर यांनी स्पष्ट केले.नाशिक येथील पॉक्सो न्यायालयाने संबंधित महिलेला तिच्या पतीला पाच वर्षांच्या मुलीचा शारीरिक आणि मानसिक अत्याचार करण्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली १० वर्षांची शिक्षा ठोठाविली.शेजाऱ्यांनी मुलीच्या अंगावर जखमा पाहून स्थानिक पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. मुलीला मारहाण केल्यानंतर तिच्या सावत्र वडिलांनी तिच्या गुप्त भागांवर मिरची पावडर लावली, अशी तक्रार शेजारच्यांनी पोलिसांकडे केली. त्यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी १५ आॅक्टोबर, २०१३ रोजी गुन्हा नोंदविला. विशेष न्यायालयाने सावत्र वडिलांनी पॉक्सोअंतर्गत दोषी ठरविले.सावत्र वडील मारहाण करतात, अशी तक्रार करूनही आईने त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही. त्यामुळे सावत्र वडिलांना हा गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल मुलीची आईही दोषी आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी विशेष पॉक्सो न्यायालयात केला आणि न्यायालयाने तो ग्राह्य धरला.मात्र, संबंधित महिलेची शिक्षा रद्द करताना उच्च न्यायालयाने म्हटले की, पॉक्सोच्या कलम १६ (३) नुसार, एखादी व्यक्ती गुन्हा घडण्यापूर्वी किंवा गुन्हा घडताना गुन्हेगाराला मदत करेत असेल, तर संबंधित व्यक्ती गुन्हेगाराला गुन्हा करण्यास प्रवृत्त करत आहे, असे म्हटले जाते. गुन्ह्याला मदत करणे, हा हेतू असला पाहिजे. जर एखाद्याला गुन्ह्यासंबंधी माहिती नसेल आणि तो जर गुन्हेगाराला मदत करत असेल, तर त्याच्यावर गुन्ह्याला प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवू शकत नाही. गुन्हा नोंदविण्यास विलंब केला, याचा अर्थ मुलीच्या आईने तिच्या पतीला गुन्हा करण्यास प्रवृत्त केले, असा होत नाही, असे म्हणत न्यायालयाने मुलीच्या आईची सुटका केली.
बघ्याची भूमिका घेतली म्हणून गुन्ह्यास प्रवृत्त केले असा अर्थ काढता येणार नाही- हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 4:10 AM