मुंबई : रविवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे ११.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. मुंबईचे किमान तापमान २२.२ अंश नोंदविण्यात आले आहे. मुंबई वगळता राज्यभरातील शहरांचे किमान तापमान १५ अंशापासून ११ अंशापर्यंत नोंदविण्यात येत आहे. परिणामी, आता कुठे महाराष्ट्र गारठू लागला असून, मुंबई मात्र थंडीच्या प्रतीक्षेतच आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.
कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. ९ ते १२ डिसेंबरदरम्यान गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. सोमवारसह मंगळवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील.
कमाल आणि किमान तापमान
अनुक्रमे ३४, २३ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.