मुंबई : माहुल येथे कोरोनाबाधितांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यावर विरोध करत येथील एका रहिवाशाने येथे रुग्णाच्या जीवास आणखी धोका असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. आठवड्यापासून सुरू असलेल्या वायुगळतीची दखल खुद्द मुंबई महापालिकेने समाजमाध्यमांद्वारे घेतल्याचे संबंधित रहिवाशाने न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले.
माहुल येथे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण असतानाही कोरोना संशयितांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. या निर्णयाला विरोध करणारी जनहित याचिका सादर करत शारदा तेवर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शारदा यांचा मुलगा आर्थर रोड कारागृहात असून त्याच्यावर खटला सुरू आहे. कारागृहातील कैदी व अंडरट्रायल्सना माहुल येथील विलगीकरण कक्षात ठेवण्याचे पालिकेच्या विचाराधीन असल्याने तेवर यांनी न्यायालयात धाव घेतली. तसेच ‘घर बचाओ, घर बनाओ’ या एनजीओनेही या निर्णयाचा विरोध केला आहे. या याचिकेच्या समर्थनार्थ माहुल येथील ६० वर्षीय नारायण माहुलकर या रहिवाशाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.माहुलकर जन्मापासून माहुल येथे राहतात. वेगवेगळ्या औद्योगिक आस्थापनांमुळे येथे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, त्वचा व डोळ्यांना खाज येणे, तसेच संपूर्ण शरीर दुखणे इत्यादी त्रास त्यांच्या कुटुंबीयांना होत असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.