Join us

सरकारचे प्राधान्यक्रम वेगळे असल्याने पोलिसांना काम करणे कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:04 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सरकारमधील तीन पक्ष सांभाळणे हाच महाविकास आघाडी सरकारच्या प्राधान्याचा विषय आहे. सत्ताधाऱ्यांनी महिलांची सुरक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सरकारमधील तीन पक्ष सांभाळणे हाच महाविकास आघाडी सरकारच्या प्राधान्याचा विषय आहे. सत्ताधाऱ्यांनी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली असून पोलिसांनाही काम करणे कठीण झाले आहे. पोलिसांचा धाक आणि दरारा कमी झाला आहे, वाझेंसारख्या प्रवृत्ती डोके वर काढत आहेत, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी केला.

भाजपच्या महिला आघाडीने साकीनाका येथील बलात्कार प्रकरणातील आरोपींना तत्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित भगिनीला लवकर न्याय मिळावा यासाठी पवई पोलीस ठाण्याच्या बाहेर मोर्चा काढला. यावेळी पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार मनीषा चौधरी, नगरसेविका शीतल गंभीर, नगरसेवक जिल्हाध्यक्ष सुशम सावंत, जतीन देसाई आदी नेते उपस्थित होते. यावेळी दरेकर म्हणाले की, राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रतिनिधींनीही घटनास्थळाला भेट दिली तेव्हा त्यांनीही महाविकास आघाडी सरकारच्या महिला सुरक्षा व्यवस्थेबाबत नापसंती व्यक्त केली. राज्यातील महिलाप्रती राज्य सरकार कमालीचे असंवेदनशील असल्यामुळे गेली दोन वर्षे राज्य महिला आयोगावर नेमणुका सरकारने केल्या नाहीत. महिला आयोगावरील नेमणुकांची फाईल उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर ते सही करत नाहीत. यावरून महाविकास आघाडी सरकार महिला सुरक्षेबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येते, अशी टीकाही दरेकर यांनी केली.

मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी बलात्काराच्या घटनेनंतर आम्ही कुठेकुठे पोलीस ठेवू, असे वक्तव्य केले होते. यावर दरेकर म्हणाले की, मुंबई पोलीस दलाचे प्रमुखच जर अशा प्रकारे हतबलता दाखवत असतील तर पोलीस दलाने काय कारायचे, पोलीस दलामध्ये ऊर्जा निर्माण करून महिला सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचा संदेश देण्याऐवजी पोलीस आयुक्त हतबलता व्यक्त करीत आहेत, हे अतिशय लाजिरवाणे आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळेच साकीनाक्यात शरमेची बाब घडली आहे. आतातरी सरकारने डोळे उघडून महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. जोपर्यंत सरकार महिला सुरक्षेबाबतचा कृती आराखडा महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवणार नाही तोपर्यंत भाजप महिला आघाडी राज्यभर आंदोलन करील, असा इशाराही दरेकर यांनी सरकारला दिला आहे.