शिवानंद शेट्टी
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. गेल्या वर्षभरापासून घाेंगावणारे काेराेना संकट तसेच आता नव्याने लावण्यात आलेले निर्बंध यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंटला मोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन हॉटेल ॲण्ड रेस्टॉरंट असोसिएशन (आहार) चे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांच्याशी साधलेला संवाद.
१. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा रेस्टॉरंट आणि बारवर काय परिणाम झाला आहे?
पहिल्या लॉकडाऊनमध्ये ३० रेस्टॉरंट आणि बार कायमस्वरूपी बंद झाले. आताही कोरोना संसर्ग वाढत असल्याने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय १० ते १५ टक्क्यांवर आला आहे. आता पार्सल सेवा केवळ २० कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू असून इतर कर्मचारी गावी गेले आहेत, काही जाणार आहेत. हे कर्मचारी पुन्हा येण्याची शक्यता कमी असून त्याचा मोठा फटका या व्यवसायाला बसणार आहे. १० ते १५ टक्के उत्पन्न मिळत आहे. त्यात खर्च कसा चालवायचा, कामगारांना पगार कसा द्यायचा आणि वीजबिल तसेच इतर शुल्क कसे भरायचे, हा प्रश्नच आहे.
२. पार्सल सेवेचा काही फायदा होत आहे का?
सध्या पार्सल सेवेला १५ ते २० टक्के प्रतिसाद मिळत आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ असल्याने ग्राहक पार्सल मागवत नाहीत. त्यातच राज्याबाहेरील कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात निघून गेला आहे. लोक घरात असल्याने बाहेरून अन्न मागवत नाहीत.
३. सरकारकडून काय अपेक्षा आहेत?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल बंद ठेवून पार्सल सेवा सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण वीजबिल, भाडे, परवाना शुल्क, ईएमआय असे अनेक प्रश्न, आर्थिक समस्या आ वासून उभ्या आहेत. हॉटेल व्यवसायावर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे. हॉटेल बंद पडल्यास त्यांचा रोजगार हिरावला जाईल.
हॉटेल व्यवसाय वाचवण्यासाठी सरकारने आर्थिक पॅकेज द्यावे.
४. ग्राहकांना काय आवाहन कराल?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व कामगारांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर केला जात आहे. पार्सल सेवा पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे ग्राहकांनी हाॅटेलमधील आपल्या मनपसंत आहाराचा आस्वाद घ्यावा.
(मुलाखत : नितीन जगताप)
----------------------------------------------