मुंबई : मंगळवारी झालेल्या बॉम्बहल्ल्यानंतर बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी ब्रुसेल्स येथील विमानतळ आणि मेट्रो त्वरित बंद केल्या, मात्र असा प्रकार मुंबईत झाला तर येथील परिस्थिती पाहता उपनगरी गाड्या व अन्य सेवा त्वरित बंद करणे कठीण आहे, असे महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथकातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.त्याच बरोबर असा प्रकार घडल्यास उपनगरीय गाड्या चालू ठेवणेसुद्धा तेवढेच धोक्याचे आहे. कारण कोठे काय स्फोटके पेरली आहेत याबाबत अनिश्चितता असते. सेवा बंद केली तर लाखो प्रवासी अडकून पडतात. त्यातून दहशतवाद्यांनी गोळीबार केला तर प्रवासी सहज समोर दिसतात आणि मोठी हानी होऊ शकते, असे या सूत्रांनी स्पष्ट केले. मंगळवारी बेल्जियममध्ये बॉम्बहल्ले होताच येथे एक उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यात हाच विषय प्रामुख्याने चर्चिला गेला. हल्ला झालेले स्टेशन त्वरित बंद केल्यास तपास अधिकाऱ्यांना पेरलेली स्फोटके शोधण्यासाठी वेळ मिळू शकतो. मेट्रो बंद केल्याने बेल्जियमच्या अधिकाऱ्यांना त्याचा फायदा झाला, पण मुंबईसारख्या शहरात तसा निर्णय घेणे कठीण आहे, असे एक अधिकारी म्हणाला.
मुंबई लोकल बंद करणे कठीण
By admin | Published: March 23, 2016 3:03 AM