Join us

मराठीचे संवर्धन करणे मराठी भाषिकांचे कर्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:09 AM

मुंबई : अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या माय मराठीचा जगभरात राहणाऱ्या सर्व मराठी बांधवांना सार्थ अभिमान वाटतो. एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे ...

मुंबई : अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या माय मराठीचा जगभरात राहणाऱ्या सर्व मराठी बांधवांना सार्थ अभिमान वाटतो. एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे मूळ मराठी भाषा बदलत आहे. त्यामुळे दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे, असे मत खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले. मराठी विचारधारा प्रतिष्ठान आणि दादर सार्वजनिक वाचनालय यांच्या सहकार्याने व मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर मासिक ‘दक्षता’च्या संपादिका शीला दिनकर साईल, दादर सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुख कार्यवाह शुभा दत्ता कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. देवदत्त लाड हे उपस्थित होते. खा. शेवाळे या वेळी म्हणाले की, भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी सर्व मराठीजनांची इच्छा आहे, त्यासाठी महाराष्ट्रातील खासदार म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे. या वेळी वृत्तपत्र लेखक संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश पांडुरंग नागणे आणि ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक चंद्रकांत पाटणकर यांना प्रदीर्घ काळ वृत्तपत्रलेखन केल्याबद्दल ‘जीवन गौरव’ सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी संघाच्या ४६व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा तसेच लेख स्पर्धा पारितोषिक वितरण सभारंभ पार पडला. या वेळी 'लोकमत' मुंबई चे उपसंपादक स्वप्निल कुलकर्णी यांच्या लेखास विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्वोत्कृष्ट २० दिवाळी अंकांना उत्कृष्ट अंक म्हणून गौरविण्यात आले.

मराठी भाषा दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विचार मांडताना ‘चित्रलेखा’चे संपादक ज्ञानेश महाराव म्हणाले, जोपर्यंत दोन मराठी माणसे एकमेकांशी भांडताना शिव्यांचा वापर करतील तोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहणार आहे. गेल्या अनेक शतकांत हजारो ज्ञानवंतांनी मराठी भाषेचे वैभव वाढविण्यासाठी, जपण्यासाठी त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केले. तर प्रशांत घाडीगावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

मराठी भाषा दिन मराठी संस्थेला 'निवारा' अभय

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेचे कार्य आणि या चळवळीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या संस्थेच्या कार्यालयासाठी कायम जागा उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. लवकरच त्याची पूर्तता होईल, असे आश्वासन खासदार राहुल शेवाळे यांनी व्यासपीठावरून दिले.

फोटो आहे -०३ राहुल शेवाळे.