मुंबई : मुलांना मातृभाषेतून शिक्षण देण्याची पद्धत योग्य असून तीच अधिक समाधानकारक आहे, असे मत ५८.७ टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.
इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेतून किंवा विद्यार्थ्यांना समजेल अशा प्रादेशिक भाषेतून देता येणार असल्याची तरतूद राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये आहे. आॅनलाइन लर्निंग मंच, ब्रेनली या संस्थेने विद्यार्थ्यांना याविषयी काय वाटते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ५८.७ टक्के विद्यार्थ्यांनी शिक्षणाची ही पद्धत समाधानकारक असल्याचे मत नोंदवले. २४.८ टक्के विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिकविल्यास अधिक उपयोग होऊ शकतो असे वाटते, तर १६.५ टक्के विद्यार्थ्यांना यासंदर्भात आपले ठाम मत नोंदविता आले नाही.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बहुभाषीय दृष्टिकोन, कौशल्य विकास तसेच डिजिटल लर्निंगवर अधिक भर आहे. ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये आधीच लोकप्रिय असल्याचे दिसते, कारण ६६.८% विद्यार्थ्यांना याबद्दल माहिती होती. ६५.६% विद्यार्थ्यांना अॅप्स, सॅटेलाइट टीव्ही चॅनेल्स, आॅनलाइन कोर्सेस इत्यादी विषय चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करतात असे वाटते.
विद्यार्थ्यांना आता पूर्वापार चालत आलेल्या, केवळ ग्रेड्सवर भर देणाऱ्या शैक्षणिक मॉडेलपासून सुटका हवी आहे. त्याऐवजी त्यांचा सर्वांगीण विकास करून संपूर्ण आयुष्यासाठी सज्ज करणारी, प्रभावी शिक्षण प्रणाली राबवणे गरजेचे आहे, असे मत ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसाणी यांनी व्यक्त केले.
नवीन शैक्षणिक धोरण सकारात्मक; ८७.७% विद्यार्थ्यांचे मत
कोरोनाकाळात भारतीय शिक्षणप्रणाली अनेक बदलांना आणि पद्धतींना सामोरी जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे त्यापैकीच एक आहे. विविध संघटना, तज्ज्ञांकडून याबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत असताना तब्बल ८७.७% भारतीय विद्यार्थ्यांनी या धोरणाकडून सकारात्मक बदल घडण्याची तसेच शैक्षणिक दर्जावरील ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केल्याचे सर्वेक्षणातून समोर आले.