मुंबई : सरकार बनविणे सोपे आहे. मात्र, एक चांगला कार्यकर्ता घडविणे हे अवघड काम आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे संघटनमंत्री असताना, त्यांनी कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. १९८५ ते ९५ दरम्यानच्या त्यांच्या संघटनात्मक कामामुळेच, १९९५ पासून गुजरातमध्ये भाजपाला सतत यश मिळत असल्याचे प्रतिपादन, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले.नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात अमित शाह यांच्या हस्ते ‘हमारे नरेंद्र मोदी’ या मूळ गुजराती पुस्तकाच्या मराठी भावानुवादाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पीयूष गोयल, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, मोदींवरील गुजराती पुस्तकाचे लेखक किशोर मकवाणा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.नरेंद्र मोदी यांच्या संघटन कौशल्यामुळे ११ आमदारांचा पक्ष १९९५ साली गुजरातमध्ये सत्ताधारी बनल्याचे सांगून, अमित शाह म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर घटनाकारांनी व्यक्तिकेंद्रित राजकारण नाकारत, बहुपक्षीय संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला होता. मात्र, दुर्दैवाने पुढच्या काळात व्यक्तिकेंद्रित व एका कुटुंबाभोवतीच भारतीय राजकारण फिरत राहिले. नरेंद्र मोदी यांनी याच परिवारवादी राजकारणाला फाटा देत, देशात पुन्हा एकदा पक्षाची सत्ता स्थापित केली. मोदींनी घडविलेला हा बदल भारतीय लोकशाहीला दिशा देणारा असल्याचे शाह म्हणाले.स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षे देशावर राज्य करणाºया काँग्रेसला कधी सामान्यांचे प्रश्न आपले वाटले नाहीत, पण मोदींनी शौचालय, प्रत्येक खेड्यात वीज, प्रत्येकाला घर, प्रत्येकाचे बँक खाते आदी सामान्यांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्यावर भर दिला. त्यासाठी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना, निश्चित कालावधीत हे प्रश्न सोडविण्याची घोषणा केली, असे शाह म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या पोकळ बाता न मारता, त्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.सर्व जग भारताला मोठी लोकशाही म्हणायचे, पण ताकदवान देश समजायचे नाहीत. मोदींच्या कालखंडात ‘जगातील एक समर्थ देश’ अशी भारताची प्रतिमा बनली आहे. नरेंद्र मोदी हे जनतेचे पंतप्रधान ठरल्याचे फडणवीस म्हणाले. मोदी व अमित शाह यांच्या रूपाने सक्षम पंतप्रधान व यशस्वी पक्षाध्यक्ष अशी जोडगोळी भाजपात कार्यरत असल्याचे पीयूष गोयल म्हणाले.अमित शाह यांच्या आजच्या दौºयात नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत कसलीच चर्चा झाली नसल्याचे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. अमित शाह सपत्निक मुंबई दौºयावर असून, सकाळी त्यांनी आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली, तर सायंकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.
सरकार बनविणे सोपे आहे. मात्र, एक चांगला कार्यकर्ता घडविणे हे अवघड - अमित शाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 5:23 AM