ई चलान दंड टाळण्यासाठी रिक्षाला दोन नंबर ठेवणे महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:11 AM2021-09-05T04:11:27+5:302021-09-05T04:11:27+5:30
मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाला ई चलान आकारले जाते. मात्र, या ई चलानचा दंड ...
मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाला ई चलान आकारले जाते. मात्र, या ई चलानचा दंड टाळण्यासाठी रिक्षा चालकाने रिक्षाला दोन नंबर ठेवण्याची शक्कल लढविली. त्याला ती महागात पडली आहे. वाहतूक पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. शकील अयुब खान असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
मानखुर्द वाहतूक विभागाचे वाहतूक पोलीस दिनेश कडवे यांना रिक्षा चालक दंड चुकविण्यासाठी बोगस नंबर वापरत असल्याची माहिती मिळाली होती. वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, संबंधित रिक्षाचा फोटो आणि माहिती पोस्ट करण्यात आली होती. तशी रिक्षा शिवाजी नगर जंक्शन येथे आढळली; पण त्याची नंबरप्लेट वेगळी होती. चौकशी केली असता रिक्षा चालक अयुब खान याने दंड टाळण्यासाठी रिक्षासाठी दुसरा नंबर वापरल्याचे मान्य केले आहे. त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.