Join us

शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवणार; उदय सामंत यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 5:33 PM

शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता.

मुंबई- शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली असून ५ जणांना अटक केली आहे. शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली होती. 

सदर आरोपींवर ३५३,१२०,३०७,३३२ कलमान्वे गुन्हा दाखल केला असून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याची चर्चा आजच्या राज्य सरकारच्या बैठकीतही झाली. या बैठकीत शिंदे गटातील आमदारांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. याबाबत मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्य पोलीस महासंचालकांना निर्देश दिल्याची माहिती समोर येत आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मंगळवारी उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला होता. गाडीवर दगड मारून पळून जाणे ही मर्दुमकी नाही. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे. ते पोलीस करतील. ज्यांनी भ्याड हल्ला केला, त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करतील. याबाबत मी पोलिसांशी बोलतो. कायदा सुव्यवस्था राखणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. 

नेमकं काय घडलं?

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही कात्रज परिसरात येणार होते. त्यामुळे या परिसरात अगोदर पासून तणाव होता. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता. आदित्य ठाकरे हे सभेनंतर थेट मुंबईला जाणार होते. ठाकरे यांनी अचानक शंकर महाराज मठाचे दर्शन घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी स्वारगेटकडील रस्ता पोलिसांनी क्लिअर केला. तोपर्यंत ठाकरे यांचा कॉन्व्हाय कात्रज चौकात थांबला होता. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉन्व्हाय गंगाधाम मार्गे शंकर महाराज मठाकडे अगोदर गेली. मात्र उदय सामंत यांची गाडी कात्रज चौकात आली. त्यावेळी सभा संपल्यानंतर संपूर्ण चौकात शिवसैनिकांनी भरला होता. उदय सामंत यांची गाडी सिग्नलला थांबली होती. ती पाहिल्यावर शिवसैनिकांनी गद्दार गद्दार म्हणत गाडीवर चपला, दगड, बाटल्या फेकल्या. त्यात गाडीची काच फुटली. हा प्रकार पहाताच पोलीस तातडीने सामंत यांच्या मोटारीला वाट करुन दिली.

टॅग्स :एकनाथ शिंदेशिवसेनाउदय सामंतपोलिस