Join us

'दसरा मेळाव्यात भारताचा अपमान केला'; उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

By मुकेश चव्हाण | Published: October 27, 2020 7:19 PM

तक्रार अर्ज औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडे एका वकीलाकडून करण्यात आला आहे.

मुंबई/ औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा शिवाजी पार्कजवळील सावरकर राष्ट्रीय स्मारकात घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा होता. मात्र आता शिवसेनेच्या या दसरा मेळाव्यात भारताचा आपमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज औरंगाबाद पोलीस आयुक्तांकडे एका वकीलाकडून करण्यात आला आहे.

अॅड. रत्नाकर चौरे या वकीलांनी उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात  भारत देशाची तुलना पाकिस्तान आणि बांग्लादेश सारख्या दहशतवादी आणि मुस्लिम राष्ट्राशी केली. त्यामुळे या तुलनेनं भारताचा अपमान झाला आहे. याचप्रमाणे हिंदुत्वाचा त्याग करून त्यांनी राज्याची सत्ता संपादन करून राष्ट्रीय व धार्मिक भावना दु:खविल्याचाही आरोप तक्रारदारकडून करण्यात आला आहे. 

तत्पूर्वी,  कोरोनासह राज्यात विविध  मुद्यांवरून सरू असलेल्या राजकीय  घमासानाबाबत उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता होती. राज्यपाल-मुख्यमंत्री संघर्ष, जीएसटी, बिहारचं राजकारण, सुशांतसिंह मृत्यू प्रकरण, कंगना रनौतवरून निर्माण झालेला वादंग अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी अत्यंत आक्रमक शैलीत समाचार घेतला. तर, मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाबाबतही नागरिकांना आश्वस्त  करण्याचा प्रयत्न केला. तसेच मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करण्याऱ्या अभिनेत्री कंगना राणौतचा चांगला समाचार घेतला. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कंगनावर निशाणा साधला होता.

 मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे पंतप्रधान मोदींचा अपमान आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि मुंबईशी नमकहरामी करायची. अनधिकृत बांधकाम मुंबईत करायची. हिंमत असेल तर पाकव्याप्त सोडा काश्मीरमध्ये अधिकृत बांधून दाखवा. मुंबई हा पाकव्याप्त काश्मीर आहे म्हणणारा रावण आला आहे, असे उद्धव ठाकरे कंगनाला उद्देशून म्हणाले होते. पाकव्याप्त काश्मीर भारतात घेऊ असे पंतप्रधान नरेंद्र मोदीच म्हणतात. पण प्रत्यक्षात आपल्या ताब्यात जे काश्मीर आहे तेथील जमिनीचा साधा तुकडाही आपण घेऊ शकत नाही, अशी आजची स्थिती आहे. हे सगळे असताना आपल्याच देशातील एखाद्या भागाला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हा एकप्रकारे नरेंद्र मोदींचाच अपमान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनापोलिसभारतऔरंगाबाद