तीन आठवडे झाले, आरेवासीय कार्यकारी अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 11:00 AM2024-02-20T11:00:39+5:302024-02-20T11:02:04+5:30
बदलीचे आदेश निघून २० दिवसांचा कालावधी उलटला.
मुंबई : महसूल व वन विभागाच्या ३१ जानेवारीच्या आदेशानुसार आरे येथील मुख्य प्रशासकीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांची बदली मुद्रांक जिल्हाधिकारी (अंमलबजावणी) पदावर करण्यात आली. शासनाचे उपसचिव संतोष गावडे यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने हे बदलीचे आदेश काढले होते.
आता २० दिवस झाले तरी आरेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची अजून नियुक्तीच सरकारने केली नाही. त्यामुळे आरेवासीयांना वाली कोण? आरेवासीयांनी समस्या मांडायच्या तरी कोणाकडे? असा सवाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाग क्रमांक ५२ चे शाखाप्रमुख संदीप गाढवे यांनी केला आहे.
अखेर शासनाने केली बदली :
१) आपल्या कार्यकालात बाळासाहेब वाकचौरे यांनी आरेच्या इको सेन्सिटिव्ह झोनच्या नावाखाली गेली १०० वर्षे सुरू असलेल्या आरे तलावातील गणेश विसर्जनाला त्यांनी
घातलेली बंदी आणि आरेच्या विकासकामांना त्यांनी लगाम घातला होता.
२) यामुळे त्यांच्यावर आरेची जनता व लोकप्रतिनिधी नाराज होते. त्यांच्या विरोधात आरेवासीयांनी केलेल्या तक्रारींची दखल अखेर शासनाने घेतली.
आरेमधील अंतर्गत रस्ते दुरुस्त करा, आरे युनिट क्रमांक १६ मधील आरे हॉस्पिटल ठेकेदाराला न देता आपला दवाखाना म्हणून घोषित करा, आरेमधील नागरिकांना लाइट मीटर व घर दुरुस्तीला परवानगी द्या, आरेतील पडायला आलेली सरकारी निवासस्थाने व शौचालये तात्काळ दुरुस्त करा, आरेतील सर्व धार्मिक स्थळांना लाइट मीटर व दुरुस्तीसाठी परवानगी द्या या विविध मागण्यांसाठी आता दाद आम्ही मागायची तरी कोणाकडे, असा सवाल गाढवे यांनी सरकारला विचारला आहे.