शिवसेनेचा बडा नेता प्राप्तिकर विभागाच्या रडारवर; धाबे दणाणले, पुरावे चाचणीसाठी पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 10:25 AM2022-03-19T10:25:44+5:302022-03-19T10:25:54+5:30

आरटीओ अधिकाऱ्यांची कोट्यवधींची माया उघड

It has come to light that a big leader of Shiv Sena is on the radar of income tax department | शिवसेनेचा बडा नेता प्राप्तिकर विभागाच्या रडारवर; धाबे दणाणले, पुरावे चाचणीसाठी पाठविले

शिवसेनेचा बडा नेता प्राप्तिकर विभागाच्या रडारवर; धाबे दणाणले, पुरावे चाचणीसाठी पाठविले

Next

मुंबई : प्राप्तिकर विभागाने मुंबईसह पुणे, सांगली, रत्नागिरी अशा तब्बल २६ हून अधिक ठिकाणी राबविलेल्या शोधमोहिमेतून सेनेच्या मंत्र्यांशी संबंधित रिसॉर्ट आणि आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या मालमत्तेची महत्त्वपूर्ण माहिती प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली आहे. या छापेमारीदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, मालमत्तेच्या व्यवहारातून सेनेचा बडा नेता रडारवर आला आहे. आतापर्यंतच्या कारवाईदरम्यान ६६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच, इलेक्ट्रॉनिक पुरावे, डिजिटल डेटा जप्त केला असून ते चाचणीकरिता पाठविले आहेत.

प्राप्तिकर विभागाने ८ मार्च रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे विश्वासू निकटवर्तीय उद्योजक राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी छापे टाकले. कनाल यांच्यासोबतच परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या अंधेरीतील घरी छापेमारी करीत प्राप्तिकर विभागाने शोधमोहीम राबविली. परब यांचे लेखापरीक्षक (सीए) असलेल्या व्ही. एस. परब असोसिएट्स यांच्या घर, कार्यालयांवर तसेच, पुण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घर आणि मालमत्तांवर झाडाझडती केली. 

दापोली येथे एका मोठ्या राजकीय नेत्याने २०१७ साली जमीन खरेदी केली. १ कोटीच्या बदल्यात ही जमीन देण्यात आली होती. या व्यवहाराची नोंद २०१९ मध्ये करण्यात आली. २०१७ ते २०२० या दरम्यान या जमिनीवर आलिशान रिसॉर्ट बनवले गेले. पुढे, ही जमीन अधिकृतरीत्या त्या राजकीय नेत्याच्या नावे झाली. पण रिसॉर्ट पूर्ण झाल्यावर ही संपत्ती मुंबईतील एका केबल व्यावसायिकाला विकण्यात आली. पण फक्त स्टॅम्प ड्यूटी भरली गेली. या रिसॉर्टवर ६ कोटी खर्च करण्यात आले होते, असे तपासातून समोर आले आहे. 

काय सांगतात कागदपत्रे?

पुण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घर आणि मालमत्तांवर छापेमारी करीत प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात खरमाटे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाइकांनी मागील १० वर्षांच्या काळात पुणे, सांगली आणि बारामती येथे मोक्याच्या ठिकाणी मालमत्तांच्या स्वरूपात प्रचंड संपत्ती खरेदी केल्याचे उघड झाले.

खरमाटे यांच्या कुटुंबाकडे पुण्यात एक बंगला, एक फार्म हाऊस, तासगाव येथे मोठे फार्म हाऊस, सांगलीमध्ये दोन बंगले, तनिष्क व कॅरेट नावाचे हिऱ्यांच्या दागिन्यांचे शोरूम, व्यावसायिक गाळे, पुण्यात ५ फ्लॅट, नवी मुंबईत एक फ्लॅट, नवी मुंबईत जमीन, सांगली बारामती पुणे येथे १०० कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती अशी माया गोळा केली. तसेच त्यांनी बांधकाम आणि पाईपनिर्मितीचा व्यवसायसुद्धा सुरू केला. या व्यवसायात राज्य सरकारमार्फत काही सवलतही दिली गेली आहे का, याबाबत प्राप्तिकर विभाग अधिक तपास करीत आहे.

बनावट व्यवहार आणि बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने जवळपास २७ कोटी रुपयांचा अपहार केला गेला आहे. बारामती येथे दोन कोटी रुपये रोख देऊन जमिनीचा व्यवहार करण्यात आला. ज्यात कर बुडवण्यात आला असल्याचे समोर आले आहे.

२६ हून अधिक ठिकाणी सर्च ऑपरेशन-

मुंबई, पुणे, सांगली, रत्नागिरीत येथे २६ हून अधिक ठिकाणी हे सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. या दरम्यान महत्त्वपूर्ण माहिती प्राप्तिकर विभागाच्या हाती लागली आहे. 

Web Title: It has come to light that a big leader of Shiv Sena is on the radar of income tax department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.