पाणी तुंबणार नाही, असे कधीच बाेलले नाही, महापौरांचा बचावात्मक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 07:01 AM2021-06-10T07:01:44+5:302021-06-10T07:02:18+5:30
Mumbai Rain : मुंबईतील काही भागांमध्ये बुधवार सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी तुंबले. पहिल्याच सरीमध्ये मुंबईची अशी दयनीय अवस्था झाल्याने महापौरांनी अशा भागांची पाहणी केली.
मुंबई : मुंबईत पाणी भरणार नाही, असा दावा कधीच केला नव्हता. पाणी तुंबल्यानंतर चार तासांत त्याचा निचरा होत नसल्यास झालेल्या कामाबाबत शंका येऊ शकते. मात्र, बुधवारी मुसळधार पाऊस होऊनही अनेक भागांतील पाण्याचा निचरा झाला. एखाद-दुसऱ्या ठिकाणी चार तासांनंतरही पाणी साचले होते, असा बचाव महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी केला.
मुंबईतील काही भागांमध्ये बुधवार सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी तुंबले. पहिल्याच सरीमध्ये मुंबईची अशी दयनीय अवस्था झाल्याने महापौरांनी अशा भागांची पाहणी केली. पाणी तुंबलेल्या ठिकाणांची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चार तासांचे गणित मांडले. पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नियोजित कामे झाली असल्याचा दावाही महापाैर पेडणेकर यांनी यावेळी केला.
समुद्राला भरती असल्यास पाणी शहरात शिरू नये, यासाठी फ्लड गेट बंद ठेवावे लागतात, तसेच मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहिल्यास पाणी तुंबणारच नाही, असे कधीही म्हटले नव्हते, असा बचाव त्यांनी केला. अनेक भागांत तुंबलेल्या पाण्याचा निचरा चार तासांत झाला आहे. चार तासांत पाण्याचा निचरा झाला नसता, तरच झालेल्या कामाबाबत साशंकता व्यक्त होऊ शकते, असे महापौरांनी स्पष्ट केले.
विरोधकांना प्रत्युत्तर
मुंबईत सतत पाऊस सुरू आहे, अशीच परिस्थिती इतर शहरांचीही आहे. पुणे शहरातही पाणी तुंबते. केवळ आरोप करू नये, परिस्थितीही समजून घ्यावी, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.
उपाययोजना सुरू राहणार
मुंबईत बांधलेल्या उदंचन केंद्रांमुळे पूर्वीपेक्षा कितीतरी पट अधिक वेगाने म्हणजे अवघ्या तीन ते चार तासांत पाण्याचा निचरा होत आहे. पाणी साचलेल्या ठिकाणाची पाहणी करून तेथील नेमकी कारणे समजून घेण्यात येत आहेत. त्यानुसार त्या परिसरात अतिरिक्त उपाययोजना करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.