मुंबई/जळगाव - भाजपाने लोकसभेच्या २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये, विद्यमान ४ खासदारांचा पत्ता कट केला होता. या चारही जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यामध्ये, जळगावच्या उन्मेष पाटील यांचेही तिकीट कापडण्यात आले आहे. त्यामुळे, उन्मेश पाटील नाराज झाले असून त्यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर, आज शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांनी उन्मेष पाटील यांना प्रश्न विचारले. मात्र, त्यांनी नम्रपणे पत्रकारांना उत्तरं देणे टाळले. तसेच, मी याबाबत उद्याच तुमच्यासोबत संवाद साधेन, असेही त्यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीची उमेदवारी न दिल्याने नाराज असलेले भाजपा खासदार उन्मेष पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. पाटील हे मुंबईत संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी आले होते. जळगावात अगोदर एकनाथ शिंदेंनी भाजपाला जय श्रीराम करत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. आता, उन्मेष पाटील यांनी शिवबंधन हाती बांधल्यास भाजपाला जळगावमध्ये तगडा झटका मिळू शकतो. त्याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांच्या भेटीनंतर उन्मेष पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना, आज वेदना होत आहेत, असे म्हटले. पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नावर उत्तर देणं पाटील यांनी टाळले. यावेळी, तुम्हाला नाही म्हणताना आज वेदना होत आहेत. मात्र, यासंदर्भात मी उद्या सकाळी तुमच्यासोबत संवाद साधेन, असे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाची किंवा भाजपाला सोडचिठ्ठी देण्यासंदर्भातील घोषणा उद्या होऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
उन्मेष पाटील हे जळगावचे विद्यमान खासदार आहेत. यावेळी भाजपाने पाटील यांचे तिकीट कापून माजी आमदार स्मिता वाघ यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. पाटील यांना भाजपातून अंतर्गत विरोध होता. तर महाविकास आघाडीमध्ये जळगावची जागा ठाकरे गटाकडे आली आहे. ठाकरे शिवसेनेकडून डॉ. हर्षल माने आणि माजी नगराध्यक्ष कुलभूषण पाटील हेही इच्छुक आहेत. मात्र, उन्मेष पाटील यांनी शिवबंधन हाती घेतल्यास महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार म्हणून उन्मेश पाटील मैदानात उतरू शकतात. दरम्यान, उन्मेष पाटलांना शिवसेनेनं तिकीट दिल्यास स्मिता वाघ विरुद्ध उन्मेश पाटील असा एककेकाळी दोन्ही एकत्र असलेल्या भाजपा नेत्यांचा सामना होऊ शकतो.
ठाकरे गटाने अद्याप जळगावचा उमेदवार जाहीर केलेला नाहीय. यामुळे उन्मेष पाटील आणि राऊतांची भेट महत्वाची मानली जात आहे. भाजपने तिकीट नाकारल्यानंतर उन्मेष पाटील नाराज होते. आता, ठाकरे गटात त्यांचा प्रवेश होणार असल्याचे दाट शक्यता आहे.
जळगावात २०१९ मध्ये काय झाले
जळगाव मतदार संघातून भाजपचे आमदार असलेले उन्मेष पाटील हे ४ लाख ११ हजार ६१७ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले. पाटील यांना ७ लाख १३ हजार ८७४ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना ३ लाख २,२५७ मते मिळाली होती. राजकारणाचा कोणताही पुवार्नुभव नसताना वयाच्या ३६ व्या वर्षी उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव विधानसभेची निवडणुक जिंकली होती. त्यानंतर, गत २०१९ च्या निवडणुकीत ते खासदार झाले होते.