मुंबई- या जगात मोठे होण्यासाठी प्रत्येकाने प्रेरित होणे गरजेचे आहे असो म्हटले जाते, मात्र प्रत्येक व्यक्ती ही मूलतः प्रेरितच असते. जर तुम्ही योग्य विचारांनी आणि सकारात्मक दिशेने प्रेरित नसाल तर त्या प्रेरणेचा काहीच उपयोग होणार नाही, त्यामुळे सकारात्मक दिशेने प्रेरित होणं महत्त्वाचं आहे असं मत आंतरराष्ट्रीय लेखक आणि व्याख्याते शिव खेरा यांनी व्यक्त केलं. वांद्रे येथे लोकमत आणि क्राँसवर्ड यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी 'अधिक यश कसे मिळवावे' या विषयांवर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात बोलताना शिव खेरा पुढे म्हणाले, यश ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, ते काही साध्य नाही. आपल्याला आयुष्यात सतत प्रेरित राहून काम करावे लागते तेव्हाच आयुष्याचा आनंद घेता येतो. आज बहुतांश संपत्ती उभी करण्याच्या प्रयत्नात आहेत मात्र ते पैसे मिळवत नाहीत. 'मेकिंग मनी' आणि 'अर्निंग मनी' या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोक अपयशी का होतात किंवा त्यांना अपेक्षित गोष्टी का मिळत नाही याचा विचार केला तर त्याचं उत्तर लोकांना त्यांच्याच आयुष्यात सापडेल. एखादा अँथलिट यशस्वी होतो अधिकाधिक पदके मिळवून आणू शकतो कारण तो सतत चिकाटीने प्रयत्न आणि सराव करत असतो. आपण तेच करायचा कंटाळा करतो आणि यशापासून दूर राहातो. ब्रूस लीचं उदाहरण याबाबतीत नेहमी दिलं जातं, दिवसाला ५ हजार ठोसे देण्याचा त्याचा सराव होता, त्याची उंची प्रतिस्पर्ध्यांपेेक्षा कमी होती तरिही तो त्या सरावाच्या बळावर यशस्वी झाला.
सकारात्मक दिशेने प्रेरित होणेच महत्त्वाचे- शिव खेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2018 9:26 PM