Join us

आरोग्य सेवा क्षेत्रात बदल करणे महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 7:08 AM

आग दुर्घटना, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; कोरोनानंतर गांभीर्याने धडा घेणे गरजेचे

मुंबई : भंडारा येथील आग दुर्घटनेनंतर आता तरी महापालिका व राज्य शासनाने धडा घेऊन आरोग्य सेवा क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या दुर्घटनेनंतर सामाजिक-वैद्यकीय संस्थांमधील कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त करत यंत्रणांनी घटनेतून बोध घेऊन आरोग्य सेवा क्षेत्रात बदल करणे महत्त्वाचे असल्याची बाब अधोरेखित केली आहे.नव्या साथींमधील जटिलता लक्षात घेऊन तसे वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर उभे करावे लागेल. यासाठी वेळ लागेल व अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. हे अब्जावधी रुपये उभे करण्यासाठी उद्योगविश्व गतिमान करणे आणि खासगी गुंतवणूकदारांना आरोग्य सेवेत आणणे याशिवाय दुसरा मार्ग नाही, त्यामुळे पायाभूत सेवा-सुविधांचे अत्याधुनिकीकरण कऱण्यासाठी भरीव निधीची गरज आहे यावर भर दिला पाहिजे, असे मत आरोग्य सेवा संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते अनिल खोत यांनी सांगितले.  

नवे विषाणू येतील, जुने विषाणू स्वतःमध्ये बदल करतील, अशा वेळी सातत्याने संशोधन करीत नवी औषधे वेगाने शोधावी लागतील. संशोधनावर खर्च करावा लागेल. त्याचबरोबर साथरोगांमध्ये तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टरांची फळी उभी करावी लागेल. वैद्यकीय महाविद्यालयांची क्षमता वाढवावी लागेल. तेथील अभ्यासक्रम बदलावे लागतील. जिल्हा पातळीवरील आरोग्य सेवा मजबूत करावी लागेल, असे जनआरोग्य अभियानाचे डॉ. अभिजीत मोरे यांनी व्यक्त केले. भंडारा दुर्घटनेसारखी घटना आपल्या यंत्रणांसाठी अत्यंत दुर्दैवी आहे, त्यामुळे राज्य सरकारने याविषयी केवळ हळहळ व्यक्त न करता जिल्हा, तालुकास्तरावर मोठी रुग्णालये उभारली पाहिजेत असेही नमूद केले.

आरोग्य सेवा क्षेत्राला तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. यामुळे उपचारांचा दर्जा आणि रुग्णांचे आजारातून बरे होण्याचे प्रमाण वाढविण्याच्या कामी, विशेषतः असंसर्गजन्य आजारांचा भारतीय आरोग्यव्यवस्थेवरील भार कमी कऱण्याच्या कामी कशा प्रकारे मदत करत आहेत याकडे लक्ष देणे अधिकच महत्त्वाचे बनले आहे, असे मत हेल्थवेल्थच्या संस्थापिका डॉ. करुणा घाडी यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :हॉस्पिटलमुंबई