'नाटकाकडे अभ्यासपूर्ण नजरेने पाहणे आवश्यक'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 04:25 AM2020-01-03T04:25:15+5:302020-01-03T04:25:35+5:30

डॉ. जब्बार पटेल यांचे मत; नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार

'It is important to take a careful look at the play' | 'नाटकाकडे अभ्यासपूर्ण नजरेने पाहणे आवश्यक'

'नाटकाकडे अभ्यासपूर्ण नजरेने पाहणे आवश्यक'

Next

मुंबई : नाटक ही जिवंत कला आहे. या कलेकडे आपण नीट पाहिले पाहिजे. मराठी नाटक आज कुठे आहे, याचा शोध घेणे गरजेचे आहे. १०० व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने तरी अभ्यासपूर्ण नजरेने नाटकाकडे पाहणे आवश्यक आहे, असे भाष्य १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी केले. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे यशवंत नाट्य संकुलातील तालीम हॉलमध्ये डॉ. जब्बार पटेल यांचा सत्कार करण्यात आला.
१०० व्या नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर बोलताना, नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मी अर्ज करणार नाही आणि मी निवडणूक लढवणार नाही, असे नाट्य परिषदेला सांगितले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

मी नाटकासाठी खूप काही केले आहे, असा माझा दावा नाही. मी ८-१० नाटके केली आहेत. १९८५ मध्ये मी शेवटचे नाटक केले होते. मात्र मी माझ्या वयाच्या आठव्या वर्षी चेहऱ्याला रंग लावला आणि तेव्हापासून आजपर्यंत सतत नाटकांत रमत आलो आहे, नाटके पाहात आलो आहे. विजय तेंडुलकर, डॉ. श्रीराम लागू, पु. ल. देशपांडे यांनी मला खºया अर्थाने जिवंत ठेवले आहे, असेही ते या वेळी म्हणाले.
भारतीय भाषांतील विविध नाटकांचे आदान-प्रदान व्हायला हवे. मराठीतील नाटकेही इतर भाषांमध्ये यावीत, त्यासाठी नाट्य परिषदेने पावले उचलावीत. त्यांनी नाटकांकडे अभ्यासाच्या अनुषंगाने लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. जब्बार पटेल यांनी या वेळी व्यक्त केली. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, कार्यकारिणी सदस्य व प्रवक्ते मंगेश कदम आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

...म्हणून हे अध्यक्ष झाले नाहीत!
नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी नाट्य परिषदेकडून निवडणूक घेतली जाते. केवळ या कारणासाठी डॉ. श्रीराम लागू, विजय तेंडुलकर, दिलीप प्रभावळकर असे अनेक ज्येष्ठ रंगकर्मी आतापर्यंत नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झाले नाहीत. हे पद सन्मानाचे आहे आणि त्यासाठी निवडणूक घेण्याची गरज नाही, अशी भूमिका डॉ. जब्बार पटेल यांनी या वेळी मांडली.

Web Title: 'It is important to take a careful look at the play'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.