नाशिक : शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाची मागणी करणे अवास्तव असून, असे काहीच ठरले नव्हते असे सांगत शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणे अशक्य असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.
नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पीक नुकसान आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महाराष्टÑाचा पुढील मुख्यमंत्री हा भाजपाचाच असेल आणि फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे आठवले म्हणाले. शिवसेनाही भाजपबरोबर असून ते भाजपसोबतच पुढेही राहतील. दोघांनाही कमेकांशिवाय पर्याय नाही. फार तर त्यांना आणखी दोन मंत्रिपदे वाढवून मिळू शकतात. शिवसेनेने काँग्रेस, राष्टÑवादीसोबत जाण्याचा प्रश्नच नसून ही घडून न येणारी घटना आहे. तसे झालेच तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी ती मोठी प्रतारणा ठरेल, असेही आठवले म्हणाले.अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री असे देशात कुठेही घडलेले नाही. १९९५ मध्ये शिवसेनेकडे पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्रिपद होते. त्यावेळी भाजपने मुख्यमंत्रिपद मागितले नव्हते त्यामुळे शिवसेनेने तसा आग्रह करू नये.
भाजप हा शंभरपेक्षा अधिक जागा मिळविणारा मोठा पक्ष असून गेल्या पंधरा-वीस वर्षांत कोणत्याही पक्षाला १०० पेक्षा अधिक जागा मिळालेल्या नाहीत. शिवसेनेचे शंभरपेक्षा अधिक आमदार निवडून आले तर त्यांनी मुख्यमंत्रिपदघ्यावे, असा सल्लाही आठवले यांनी दिला.राज्याच्या मंत्रिमंडळात असलेल्या ४३ मंत्रिपदांपैकी १६ मंत्रिपदे शिवसेनेला आणि ४ मंत्रिपदे मित्रपक्षांना मिळणार आहेत तर उर्वरित २३ मंत्रिपदे भाजपला राहतील. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांचे ऐकू नये आणि भाजपसोबत यावे, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.