चीनच्या शत्रूंसोबत मैत्री करणे भारताच्या फायद्याचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:06 AM2021-04-05T04:06:14+5:302021-04-05T04:06:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : चीन आता जगभारतील त्यांच्या अन्य शत्रूंबरोबर लढत आहे. तसे करण्यास आपणही त्यांना भाग पाडीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : चीन आता जगभारतील त्यांच्या अन्य शत्रूंबरोबर लढत आहे. तसे करण्यास आपणही त्यांना भाग पाडीत आहोत. भारताने चीनविरोधात दुसरी आघाडी उघडली असून, चीनच्या शत्रूंबरोबर आपण मैत्री केल्याने त्याचा फायदा आपल्याला होत आहे. असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले. शुक्रवारी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरने आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानमालेमध्ये ते बोलत होते.
‘चीनच्या हायब्रीड वॉरला भारताचे प्रत्युत्तर’ या विषयावर ते पुढे म्हणाले की चीनच्या अन्य शत्रूंसोबत आपण मैत्री करणे हे आपल्याला फायद्याचे आहे. फिलिपाइन्सच्या समुद्रात चीनच्या सुमारे २५० मच्छीमार बोटींनी घुसखोरी केली आहे. हे मानसिक स्तरावरील युद्ध असल्याने आता त्यापुढे जाण्याची काही चीनची हिंमत नाही.
कोणताही देश हवाई सीमांचे उल्लंघन करत नाही, मात्र तैवानवर चीन दावा सांगत असून तैवानच्या हवाई हद्दीमध्ये गेल्या आठवड्यात तीनवेळा चीनच्या लढावू विमानांनी घुसखोरी केली. यात त्यांना आता अमेरिका व जपान मदत करत आहे.
तैवाननेदेखील क्षेपणास्त्र तैनात केली आहेत.
येत्या जुलैमध्ये चीनमध्ये तेथील कम्युनिस्ट पक्षाचे मोठे संमेलन होत आहे. म्हणूनच शि जिनपिंग चीन हे राष्ट्र किती मोठे झाले आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्या भूमिकेतूनच लडाखमध्ये चीनने भारताला त्रास देण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैन्यासमोर त्यांची डाळ शिजली नाही. आता दक्षिण चीन सागरात चीनने आपली कारवाई सुरू केली आहे. दक्षिण कोरियालाही त्रास देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. उत्तर कोरियात त्यांनी क्षेपणास्त्र तैनात केली आहेत. यासंदर्भातच कोरियाचे संरक्षणमंत्री मध्यंतरी भारत दौऱ्यावर आले होते. लार्सन अँड टुब्रोमध्ये एक मोठी तोफ तयार करण्याचे काम सुरू असून, दक्षिण कोरिया त्यासाठी मदत करीत आहे. कोरिया व भारताचे सहकार्य वाढणार आहे.
भारताने आता शस्त्रास्त्रे निर्मितीत उडी मारली असून, २०१४ मध्ये भारत शस्त्रास्त्रे ७० टक्के आयात करीत होता, ती आयात आता ४० टक्क्यांवर आली आहे. लवकरच हे प्रमाण १० टक्क्यांवर येईल. भारतात संरक्षण साधनांच्या निर्मिती क्षेत्रात २५० स्टार्टअप्स सुरू होणार आहेत. शस्त्रास्त्र निर्यातक म्हणून भारत आता पहिला २५ देशांमध्ये आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्धाप्रमाणे आता युरोपातील देश आणि चीन यांच्यातही व्यापार युद्ध सुरू झाले आहे. ही भारतालाही नामी संधी असून, त्याचा फायदा भारताने घ्यायला हवा, असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.