मुंबई- महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विरोधी पक्ष भाजपाने केलेली मागणी राज्यपालांनी आज मान्य केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात हालचालींना वेग आला आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
सरकारला ३० जून रोजी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान राज्यपालांच्या या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात राज्यपालांच्या निर्देशाविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर थोड्याच वेळात म्हणजे सायंकाळी ५ वाजता सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच न्यायालयाच्या निकालात दिलासा न मिळाल्यास उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुवाहाटीवरुन तीन वाजताच्या सुमारास शिंदे गट गोव्यासाठी रवाना होणार होता. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान भवन सचिवालय यांना पत्र पाठवले आहे. राज्यात कमालीची अस्थिरता आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांतून दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांनी इ मेल द्वारे तर विरोध पक्ष असलेल्या भाजपाने पत्राद्वारे महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याचा जावा केला आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी विरोधी पक्षाने केली. माध्यमांमधील बातम्या पाहता मुख्यमंत्र्यांना बहुमत चाचणी अपरिहार्य असून त्यांनी बहुमत सिद्ध करावे, असे राज्यपाल यांनी कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
शिंदे गटाची स्ट्रॅटेजी-
राज्यात ३ जुलै रोजी नवीन सरकार स्थापन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे राज्यात भाजपा आणि शिवसेनेचं सरकार स्थापन करण्याबाबत शिंदे गटाने स्ट्रॅटेजी तयार केल्याची माहिती समोर येत आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. सगळ्या आमदारांचे बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना, असा स्टँड बंडखोर गट घेणार आहे. त्यामुळे सरकार भाजप-शिवसेनेचे स्थापन होईल, आणि खरी शिवसेना कोणाची हा वाद निवडणूक आयोगाकडे पुढे काही वर्ष चालू राहील, अशी स्ट्रॅटेजी असल्याचे समजते.