चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 09:24 AM2024-11-26T09:24:53+5:302024-11-26T09:25:45+5:30
माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलाला उद्धव ठाकरे यांनी बहुमान दिला. मुंबईत शिवसेना सर्वांनाच हवी आहे. नुकताच लागलेला निकाल हा धक्कादायक आहे, पण या दोन्ही भावांनी एकत्र यावे की नाही याचा निर्णय मात्र उद्धव ठाकरे हेच घेतील असं आमदार महेश सावंत यांनी म्हटलं.
मुंबई - शिवाजी पार्कला धुळीच्या विळख्यातून मुक्त करण्यास प्राधान्य असेल. मैदानावरील क्रिकेट पीचच्या बाजूला हिरवळ तयार करणे. शिवाजी पार्क कट्ट्याचे सुशोभीकरण करणे हे आमदार म्हणून माझे पहिले काम असेल, असे माहीमचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आ. सावंत यांनी सोमवारी वरळी येथील लोकमतच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील कोणत्या कामाला तुमचे प्राधान्य असेल?
माहीम, दादरमध्ये सर्वांत महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी महापालिकेचे पाणी कमी दाबाने येत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. शिवाजी पार्क मैदान परिसराला धुळीने वेढले आहे. येथील पीचसाठी महापालिका भाडे आकारते. पण, त्यामानाने सुविधा नाहीत. पोलिस अकादमीची मुले सकाळी सरावासाठी येतात. नागरिक, क्रिकेट खेळण्यासाठी येणारी मुले यांना हात-पाय धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे आहे. शिवाजी पार्कचा कट्टा अनेक ठिकाणी उखडला गेला आहे. फूटपाथवर खड्डे पडले आहेत. बसण्यासाठी असलेले बाक नीट नाहीत. त्यामुळे ही सर्व कामे प्राधान्याने हाती घेणार आहे.
म्हणजे नेमके येथे काय करणार आहात?
शिवाजी पार्कमध्ये दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. माँ साहेब मीनाताई ठाकरे, बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक आणि चैत्यभूमी येथील पुतळे आहेत. त्यांची साफसफाई होत नाही. त्यामुळे महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसरची भेट घेऊन १५ दिवसांतून एकदा साफसफाई करा, असे सांगणार आहे. तसेच, मैदानातील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पीचच्या बाजूला हिरवळ तयार करण्यास सांगणार आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे असे बॅनर्स पुन्हा एकदा लागले आहेत. याबद्दल तुमचे मत काय?
माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील मुलाला उद्धव ठाकरे यांनी बहुमान दिला. मुंबईत शिवसेना सर्वांनाच हवी आहे. नुकताच लागलेला निकाल हा धक्कादायक आहे, पण या दोन्ही भावांनी एकत्र यावे की नाही याचा निर्णय मात्र उद्धव ठाकरे हेच घेतील. मात्र, नुसते एकत्र नाही तर मनातूनही एकत्र यावे लागेल. मुंबईत इतर ठिकाणी परप्रांतीय एकत्र येताना आपण अनेकदा पहिले आहे. मग, चांगल्या कामासाठी मराठी माणसे एकत्र आली तर चांगलेच आहे.