मुंबई- रत्नागिरीतील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्यांमुळे रखडला होता. मात्र हा प्रकल्प राजापूर तालुक्यातच बारसू गाव परिसरात उभारण्याबाबत राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याचेही सांगण्यात येत आहे.
रिफायनरी प्रकल्पासाठी १४ हजार एकर जागा देण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच बंदरासाठी जवळपास २४१४ एकर जागा देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांचा आणि भागांचा या उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रामध्ये उल्लेख केल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.
नाणार प्रकल्पाच्या विरोधातील स्थानिकांच्या आंदोलनाला साथ देत शिवसेनेने नाणार प्रकल्प जाणार अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे नाणार येथील रिफायनरी प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळे बारगळला होता. मात्र दोन दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तपत्रानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारचं मनपरिवर्तन झाल्यानं या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा झाल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता नाणारचा मार्ग मोकळा झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, मंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून यावेळी त्यांना नाणार येथील रिफायनरी प्रकल्पावर प्रश्न विचारण्यात आला. नाणार प्रकल्प स्थलांतरित करायचा असेल, तर तो जिथे लोकांना विचारात घेऊन जिथे विरोध नसेल अशा ठिकाणी भूमिपुत्रांना न्याय कसा मिळेल, याचा विचार करून पुढची पावलं उचलली जातील, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
नवीन प्रकल्पांची उभारणी करतानाही स्थानिकांना विचारात घेतलं जाईल, असे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले. जिथे जिथे कुठेही काही नवीन करायचं असेल मग तो हायवे असेल वा रस्ते असतील किंवा कुठला मोठा प्रकल्प असेल तर स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार, असं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.
रिफायनरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ राजापुरातच व्हावी-
रिफायनरी प्रकल्पाची मुहूर्तमेढ राजापुरातच व्हावी यासाठी राजापूरवासीयांनी कंबर कसली आहे. तालुक्यातील विविध ५७ सामाजिक संघटना, १३० ग्रामपंचायती, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा यासाठी ६ मार्च समर्थन मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथक हजर होते.
कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्हाला या रिफायनरी प्रकल्पाची नितांत गरज आहे. यापूर्वी काही एनजीओंच्या भुलथापांना बळी पडून नाणार येथील स्थानिकांनी प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र, आता ती चूक आम्ही पुन्हा करणार नाही, असे स्पष्ट करत धोपेश्वर परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी या समर्थन मेळाव्याला हजेरी लावली होती.