मुंबई - ‘महारेरा’ने एजंट्सच्या नवीन नोंदणी व नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केले होते. नव्याने नोंदणी करणाऱ्यांना मेपूर्वी व कार्यरत एजंट्सना एक सप्टेंबरपूर्वी हे प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक होते; मात्र हा कालावधी वाढविण्यासाठी विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ही मुदत वाढविण्यात आली आहे.
आता यानुसार ‘महारेरा’कडे एजंट म्हणून नव्याने नोंदणी करण्यासाठी किंवा असलेल्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी १ नोव्हेंबरपूर्वी हे प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक आहे. त्यानंतर एक नोव्हेंबरपासून हे प्रमाणपत्र असल्याशिवाय नवीन एजंट म्हणून नोंदणी वा नूतनीकरणही होणार नाही; तसेच सध्याच्या परवानाधारक एजंट्सना व बिल्डरकडील या कामांशी संबंधित कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २४ पूर्वी हे प्रमाणपत्र मिळवून त्यांच्या संकेतस्थळावर त्यांनी नोंदविणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन केले नाही तर कारवाई केली जाईल. सर्व बिल्डरांनी १ जानेवारीनंतर प्रमाणपत्र नसलेल्या एजंट्सना संबंधित व्यवहारात सहभागी करून घेऊ नये, असेही निर्देश दिले आहेत.
एजंट्सना काय माहीत हवे?
- एजंट्सना ‘रेरा’ कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी माहिती असायला हव्यात.
- ज्यात विकासक आणि प्रकल्प याची विश्वासार्ह प्राथमिक माहिती, प्रकल्पाच्या जमिनीच्या हक्काची वैद्यता, रेरा नियमानुसार चटई क्षेत्र, इमारतीचे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या तत्सम मंजुऱ्या, प्रकल्पाच्या विरुद्ध असल्यास, कज्जेदलालीचा तपशील, संबंधित विकासकाची आर्थिक क्षमता या बाबी कशा मिळवायच्या, समजून घ्यायच्या हे त्यांना माहीत असायला हवे.
- एजंट्सना प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी ‘महारेरा’ने सुमारे आठ-नऊ महिन्यांचा वेळ दिलेला आहे.
- एजंट हा घर खरेदीदार आणि बिल्डर यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे.
- बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंट्सच्याच संपर्कात येतात.
- ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते.
- एजंट्सचे हे महत्त्व लक्षात घेऊन ‘रेरा’ कायद्यामध्येही त्याचे अस्तित्व अधोरेखित करण्यात आलेले आहे.