भाजपाला माझी भीती वाटणं स्वाभाविक; आमचा आवाज कुणीही बंद करु शकत नाही- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:34 AM2022-03-30T11:34:44+5:302022-03-30T11:34:55+5:30
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे.
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणेवर तोंडसुख घेणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी केलेल्या एका ट्विटनं विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. कधी कधी मौन हेच सर्वात चांगल उत्तर असतं, असे ट्विट करत संजय राऊत यांनी करत यापुढे आपलं उत्तर हे मौन असणार असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
दररोज मीडियासमोर येऊन आपली बाजू मांडणारे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मौन बाळगल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे. मात्र यावर आता संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एखाद्या विषयावर बोललंच पाहिजे असं नाही. जेव्हा पक्षाची भूमिका असेल, तेव्हा नक्की बोलतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत म्हणाले की, माझ्या या ट्विटमुळे भाजपाला फार आनंद झाला. भाजपाला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे. मी जेवढं कमी बोलेन तेवढं भाजपाला सोयीचं आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. तसेच शिवसेनेचा आवाज, संजय राऊतांचा आवाज, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आवाज कुणीही बंद करु शकणार नाही, असं स्पष्टीकरणही संजय राऊत यांनी यावेळी दिलं.
दरम्यान, भाजपाचे खासदार वरुण गांधी यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी रात्री ही भेट झाली. सुमारे तीन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यामुळे या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र ही फक्त सदिच्छा भेट असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
वरुण गांधी काल भेटीसाठी आले होते. ते एक राजकीय नेते असले तरी ते लेखक आहेत. छान पुस्तकं लिहितात. अनेक विषयांवर वरुण गांधी चांगल्या गप्पा मारतात. माझी आणि वरुण गांधी यांची भेट सदिच्छा भेट होती. वरुण गांधी आणि त्यांच्या परिवाराचे ठाकरे कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. ते इतर अनेक नेत्यांनाही भेटतात, असं संजय राऊत यांनी सांगितलं.