विरोध ‘मजहब’ला नाही,’गहजब’ला; धार्मिक नाही, सामाजिक मुद्दा, राजू पाटलांचं ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 10:41 AM2022-04-30T10:41:37+5:302022-04-30T10:42:44+5:30
राज ठाकरेंच्या सभेची चर्चा देशभर सुरु आहे. तसेच नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्सुक आहे.
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये जाहीर सभा होत असून यासाठी मनसैनिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. राज ठाकरे सध्या पुण्यात पोहोचले असून थोड्याचवेळात ते औरंगाबादसाठी रवाना होणार आहेत. त्याआधी राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे कालच औरंगाबादमध्ये पोहोचले होते. आज सकाळी अमित ठाकरे यांनी सभास्थळाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आहे.
धार्मिक नाही,सामाजिक मुद्दा आहे.
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) April 29, 2022
नवीन काहीच नाही,जुनाच कायदा आहे.
विरोध ‘मजहब’ला नाही...’गहजब’ला आहे.#MNS#महाराष्ट्रदिन#राजसभाpic.twitter.com/2jkUR2rHlD
राज ठाकरेंच्या सभेची चर्चा देशभर सुरु आहे. तसेच नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उत्सुक आहे. याचदरम्यान, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये धार्मिक नाही,सामाजिक मुद्दा आहे. नवीन काहीच नाही,जुनाच कायदा आहे. विरोध ‘मजहब’ला नाही...’गहजब’ला आहे, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळालेली असली तरी पोलिसांकडून अनेक अटी आणि नियम घालून देण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या आवाजाच्या ७५ डेसिबलच्या मर्यादेचं पालन कसं होणार? असं विचारलं असता मनसे नेते अमित ठाकरे यांनी आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत आणि अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार आहोत, असं अमित ठाकरे म्हणाले.
अमित ठाकरे यांनी सभास्थळी भेट दिल्यानंतर व्यासपीठ, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठीची आसनव्यवस्था, पत्रकार कक्ष आणि पोलिसांसाठी करण्यासाठी व्यवस्था अशी सर्वबाबींची माहिती जाणून घेतली. "काही पक्षप्रवेश होणार होते त्यामुळे मी कालच औरंगाबादमध्ये दाखल झालो होतो. आज सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी आलो आहे. तयारी खूप उत्तम झालेली असून सभेची प्रचंड उत्सुकता सर्वांमध्ये आहेत. उद्याची सभा जोरदार होईल यात शंका नाही", असं अमित ठाकरे यावेळी म्हणाले.