अक्कल दाढेच्या आधारे वय ठरवणे अयोग्य; उच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 06:01 AM2023-05-09T06:01:34+5:302023-05-09T06:04:46+5:30
आरोपीची निर्दोष सुटका
मुंबई : मुलगा वा मुलीला कायमचे दात त्यांच्या योग्य वयात येतात. मात्र, अक्कल दाढ साधारणत: १७ ते २५ या वयात येते. अक्कल दाढ असलेली मुले १७ वर्षे वा त्याहून अधिक वयाची आहेत, असे म्हणू शकतो. मात्र, अक्कल दाढ न आलेल्या मुलाचे वय १८ पेक्षा कमी आहे, असे म्हणू शकत नाही. त्यामुळे अक्कल दाढेच्या आधारे वय ठरविणे योग्य नाही. सबब अक्कल दाढ न येणे हे बलात्कार पीडिता अल्पवयीन असल्याचा निर्णायक पुरावा नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीची निर्दोष सुटका केली.
महा‘विसंवाद’ आघाडी! पवारांवरील टीका अन् नेते पळविण्यावरून वादाची ठिणगी
रायगड येथील विशेष न्यायालयाने १८ डिसेंबर २०१९ रोजी अपीलकर्त्याला दोषी ठरवताना दंतचिकित्सकाच्या साक्षीचा आधार घेतला. पीडितेचे वय ठरविताना दंतचिकित्सकाने तिची वैद्यकीय रेडिओग्राफिक अशा दोन्ही प्रकारे चाचण्या केल्या होत्या. पीडितेला अक्कल दाढ आलेली नसल्याचे त्याने स्पष्ट केले. याचा अर्थ पीडिता १५ ते १७ वर्षांची असावी. मात्र, दंतचिकित्सकने १८ वर्षानंतरही अक्कल दाढ येऊ शकते, असे उलटतपासणीत सांगितले. याची नोंद न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या एकलपीठाने घेतली.
न्यायालय म्हणाले...
सरकारी वकिलांनी पीडितेचे वय सिद्ध करण्यासाठी योग्य साक्षीदारांची साक्ष नोंदविली नाही.
मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे, हे सिद्ध करण्यास सरकारी वकील सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांच्यातील संबंध संमतीचे होते.
त्यामुळे आरोपीवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही.
प्रकरण काय?
बलात्कार व पोक्सोच्या अन्य कलमांअतर्गत दोषी ठरविण्यात आलेल्या मेहरबान खान याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार. आरोपीने लग्नाचे खोटे आमिष दाखवित अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले. २५ मार्च २०१६ रोजी मुलीने ती गरोदर असल्याचे आरोपीला सांगितले.
आरोपीने गावी जाऊन विवाह करण्याची तयारी दर्शविली. परंतु, त्यानंतर तो तिला टाळू लागला. १९ डिसेंबर २००० चा जन्म असल्याचा दावा करणाऱ्या पीडितेने खान विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली.
खानच्या म्हणण्यानुसार, तो उत्तर प्रदेशहून परतल्यावर पीडितेशी विवाह करणार होता आणि खरोखरच त्याने परतल्यावर पीडितेला शोधण्याचा प्रयत्न केला. तिला शोधण्याआधीच पोलिसांनी अटक केली.
आपल्याला पीडितेशी विवाह करायचा आणि तिने जन्म दिलेल्या बाळाचा सांभाळही करायचा आहे, असे खान याने न्यायालयाला सांगितले.